’जोपर्यंत रामभाऊ सातपुते आमदार होणार नाहीत, तोपर्यंत चहा पिणार नाही!’अकलूजचे नगरसेवक महेश शिंदे यांचा अनोखा आणि कडक संकल्प; राजकीय वर्तुळात मोठी चर्चा

Times 9 Marathi News Network
अकलूज :राजकारणात नेत्यांवरील निष्ठा व्यक्त करण्याचे अनेक प्रकार आपण आजवर पाहिले असतील, मात्र अकलूजमध्ये एका कार्यकर्त्याने आपल्या नेत्यासाठी घेतलेला अनोखा संकल्प सध्या संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे. “जोपर्यंत भारतीय जनता पक्षाचे नेते व माळशिरसचे माजी आमदार रामभाऊ सातपुते पुन्हा आमदार होत नाहीत, तोपर्यंत मी चहाच्या घोटालाही हात लावणार नाही,” असा कडक संकल्प अकलूज नगर परिषदेचे प्रभाग क्रमांक ८ चे नगरसेवक महेश शिंदे यांनी केला आहे.
आपल्या नेत्यावरील अतूट श्रद्धा आणि निष्ठेपोटी त्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.
राजकारणात अनेक जण विविध प्रकारची व्रत किंवा संकल्प करतात. मात्र, महेश शिंदे यांनी थेट आपल्या दैनंदिन जीवनातील आवडीच्या चहाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. काहींना हा संकल्प वेगळा किंवा भावनिक वाटू शकतो, तर भाजप कार्यकर्ते याकडे राजकीय बांधिलकी आणि नेतृत्वावरील पराकोटीच्या विश्वासाचे प्रतीक म्हणून पाहत आहेत.
आपल्या या निर्णयाबाबत बोलताना नगरसेवक महेश शिंदे म्हणाले,
”रामभाऊ सातपुते यांनी माळशिरस मतदारसंघाच्या विकासासाठी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष केला आहे. त्यांच्या कामाची पद्धत आणि सर्वसामान्यांशी असलेली नाळ यामुळे मी प्रभावित आहे. ते पुन्हा एकदा सन्मानाने विधानसभेत जावेत, हीच माझी आणि मतदारसंघातील जनतेची इच्छा आहे. त्यांच्या याच कार्यावर पूर्ण विश्वास असल्याने मी हा संकल्प केला असून, ते पुन्हा आमदार होईपर्यंत मी चहा घेणार नाही.”

नगरसेवक महेश शिंदे यांच्या या जाहीर घोषणेमुळे रामभाऊ सातपुते यांच्या समर्थकांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्याचा हा ‘चहा त्याग’ मतदारसंघातील राजकीय वातावरण अधिकच तापवणारा ठरणार, यात शंका नाही.



