क्राईम

अकलूज पोलिसांची धडक कारवाई: १७ पिस्तूल आणि ४७ जिवंत काडतुसांसह १८.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त; ६ आरोपींना अटक

अकलूज (प्रतिनिधी):
अकलूज पोलीस ठाण्याच्या पथकाने अवैध अग्निशस्त्रांची तस्करी आणि विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल १७ देशी बनावटीची पिस्तूल (कट्टे), ४७ जिवंत काडतुसे (राउंड्स) आणि गुन्ह्यात वापरलेली एक टाटा नेक्सॉन कार असा एकूण १८ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एकूण ६ आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना २१ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

१४ ऑगस्ट २०२६ रोजी अकलूज-टेंभुर्णी रस्त्यावरील संगम जवळ एक संशयित इसम टाटा नेक्सॉन कारमधून (क्रमांक MH 45 E 7002) अवैध पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती अकलूज पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून मुख्य आरोपी विकास कैलास वजाळे (वय ३१, रा. परीते, ता. माढा) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुरुवातीला २ पिस्तूल, ४ जिवंत काडतुसे आणि कार जप्त करण्यात आली.

अटक आरोपी विकास वजाळे याच्याकडे कसून चौकशी केली असता, त्याने हे अग्निशस्त्र राहुल सतीश माने (रा. मिरज, जि. सांगली) आणि अनिल पंचलाल मेहता (रा. रांजणगाव, जि. बडवानी, मध्य प्रदेश) यांच्याकडून आणून सोलापूर व सांगली जिल्ह्यातील विविध लोकांना विकल्याची कबुली दिली.

तपासाची चक्रे वेगाने फिरवत अकलूज पोलिसांच्या विशेष पथकाने धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथून मध्य प्रदेशातील मुख्य पुरवठादार अनिल मेहता याला ४ पिस्तूल आणि २५ काडतुसांसह अटक केली. त्यानंतर टेंभुर्णी परिसरातून फरार आरोपी राहुल सतीश माने याला ताब्यात घेण्यात आले. राहुल माने याच्याकडून अधिक ६ पिस्तूल आणि ८ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. राहुल माने हा उमदी पोलीस ठाण्यातील (जि. सांगली) एका गुन्ह्यात फरार आरोपी होता.

जप्त केलेला मुद्देमाल
देशी बनावटीची पिस्तूल (अग्निशस्त्रे): १७ नग (किंमत ₹१०,४०,०००/-)
जिवंत काडतुसे (राउंड्स): ४७ नग (किंमत ₹४७,०००/-)
टाटा नेक्सॉन कार (MH 45 E 7002): १ नग (किंमत ₹८,००,०००/-)
एकूण जप्त किंमत: ₹१८,४७,०००/-

अटक व फरार आरोपींची माहिती
१) विकास कैलास वजाळे (वय ३१)परीते, ता. माढा, जि. सोलापूरअटक (२१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी)
२) राहुल सतीश माने (वय ३४)मिरज, जि. सांगलीअटक (२१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी)
३) महादेव बाळासाहेब कोरके (वय ३०)करकंब, ता. पंढरपूर, जि. सोलापूरअटक (२१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी)
४) विजय सदाशिव किरणगी (वय ३४)शिवणूर, ता. आटणी, जि. बेळगाव (कर्नाटक)अटक (२१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी)
५) अनिल पंचलाल मेहता (वय ३२)रांजणगाव, ता. वरला, जि. बडवानी (मध्य प्रदेश)अटक (२१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी)
६) सुमित नाना लवटे (वय १९)सांगोला, जि. सोलापूरअटक (२१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी)
७) प्रदीप पांडुरंग मानेचिक महूद, ता. सांगोला, जि. सोलापूर फरार
८) शनि भारत बनसोडेअकोले खुर्द, ता. माढा, जि. सोलापूर फरार

ही धडक कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, पंढरपूर विभागाच्या अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे व उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे, सह-पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे, अंकुश वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम आणि अंमलदार श्रीराम पोरे, शिवकुमार मदभावी, राहुल रणनवरे, अमोल बकाल, समीर पठाण, दत्तात्रय खरात, रणजित जगताप, तुकाराम माने देशमुख, विजय तवटे तसेच सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कामगिरी फत्ते केली. या गुन्ह्याचा पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button