डहाणूतील न्यू लक्ष्मी ज्वेलर्स घरफोडीचा छडा; तीन आरोपी अटकेत….पालघर पोलिसांची कामगिरी

टाईम्स 9मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
डहाणू शहरातील न्यू लक्ष्मी ज्वेलर्समध्ये झालेल्या धाडसी घरफोडी व चोरीच्या गुन्ह्याचा पालघर पोलिसांनी छडा लावला असून, या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा, पालघर आणि डहाणू पोलिसांची स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली. गोपनीय माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत पोलिसांनी प्रथम यशवंत सदू चौधरी (वय ४०) याला २७ जुलै रोजी अटक केली. त्यानंतर तपासात निष्पन्न झालेल्या दिपेश यशवंत गवळी (वय २२) आणि विशाल चौरे (वय २३) या दोघांना १३ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने आरोपींना पोलिस कोठडी मंजूर केली होती. पोलिसांच्या तपासामुळे चोरीच्या घटनेचा उलगडा झाला असून, आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्याच्या दृष्टीने पुढील तपास सुरू आहे.
दि. २० जून २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास डहाणू येथील न्यू लक्ष्मी ज्वेलर्समध्ये ही घटना घडली. काळ्या रंगाचा तोंडाला मास्क बांधलेले व काळ्या रंगाचे जॅकेट घातलेले अंदाजे २५ ते ३० वर्षे वयोगटातील तीन व्यक्ती दुकानात शिरल्या. त्यांनी दुकानातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरून नेण्याचा प्रयत्न केला.यावेळी दुकानदाराने प्रतिकार केल्यानंतर आरोपींपैकी एकाने बंदुकीतून गोळीबार करून दुकानदाराला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपींनी दुकानातील काचा फोडून मोठ्या लोखंडी सुऱ्याच्या सहाय्याने नुकसान केले आणि अंदाजे ७०० ग्रॅम वजनाचे, सुमारे ८० लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तसेच इमिटेशन ज्वेलरी घेऊन पलायन केले.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, पालघर व डहाणू पोलिसांनी स्वतंत्र तपास पथके तयार केली. गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि विविध तपासाच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपींचा माग काढला.
या कारवाईमुळे डहाणूतील व्यापारी वर्गासह नागरिकांना दिलासा मिळाला असून, घरफोडी व चोरीच्या गंभीर गुन्ह्याचा तपास वेगाने पूर्ण करून आरोपींना जेरबंद केल्याबद्दल पालघर पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
चोरीला गेलेल्या दागिन्यांची पूर्ण जप्ती, गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे तसेच अन्य बाबींचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
तपासादरम्यान पोलिसांनी सोन्याचे दागिने जप्त केले असून, पुढील तपास सपोनि अंकुर शेलार, डहाणू पोलीस ठाणे यांच्या मार्फत सुरू आहे.या धाडसी कारवाईबद्दल पालघर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि डहाणू पोलिसांचे कौतुक होत असून, गुन्हेगारांवर पोलिसांनी केलेली ही कारवाई नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे.



