माळशिरस तालुका तलाठी संघाच्या अध्यक्षपदी अनिल घेरडे यांची पुनर्निवड; मित्रपरिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव

अकलूज (प्रतिनिधी) सोमनाथ पवार टाइम्स ९ मराठी न्यूज
माळशिरस तालुका तलाठी संघाच्या अध्यक्षपदी अनिल चंदू घेरडे यांची सलग दुसऱ्यांदा पुन्हा एकदा निवड झाली आहे. माळशिरस येथील महसूल भवनमध्ये पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत गुप्त मतदान पद्धतीने ही निवड करण्यात आली. अनिल घेरडे यांच्या या विजयामुळे संपूर्ण तालुक्यातून व मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर कौतुकास्पद शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
तलाठी संघाच्या एकूण ७९ सदस्यांपैकी ६७ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये अनिल घेरडे यांना ४० मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी गणेश शामराव भानवसे यांना १७, तर प्रकाश शिवाजी भोसले यांना १० मते मिळाली. अनिल घेरडे यांनी २३ मतांचे स्पष्ट बहुमत मिळवत आपले अध्यक्षपद कायम राखले.
अनिल घेरडे यांनी यापूर्वी एप्रिल २०२१ ते एप्रिल २०२६ या पंचवार्षिक कालावधीत संघाचे अध्यक्ष म्हणून यशस्वी जबाबदारी सांभाळली होती. मुदत संपल्यानंतर नवीन निवडणूक होईपर्यंत त्यांनी काळजीवाहू अध्यक्ष म्हणून पद भूषवले. आता निवडणुकीत पुन्हा बाजी मारत सदस्यांचा त्यांच्यावरील विश्वास सिद्ध झाला आहे.
अनिल घेरडे भाऊसाहेब यांच्या पुनर्निवडीबद्दल त्यांचे जिवलग मित्र मुबारक कोरबू साहेब, तलाठी पदाधिकारी, महा ई-सेवा केंद्र संचालक व लिपीक वर्ग तसेच सर्व मित्रपरिवाराच्या वतीने आनंद व्यक्त करत त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला आणि पुढील वाटचालीस उदंड शुभेच्छा देण्यात आल्या.
या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विजयकुमार जाधव यांनी तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संदीप चव्हाण यांनी काम पाहिले.



