बुलेट ट्रेनच्या कामाविरोधात पालघर जिल्ह्यातील टेंभीखोडावे जेटीवर जन आक्रोश…. एल अँड टी कंपनीला आगरी सेनेचा घेराव.

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या अवाढव्य कामामुळे स्थानिक नागरिकांच्या वडिलोपार्जित शेतजमिनी बाधित झाल्या आहेत या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी व युवा पिढीचे आयुष्य उध्वस्त होऊ नये म्हणून भविष्याचा विचार करून एल अँड टी कंपनीच्या कारभाराविरोधात अखेर मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी आक्रोशाचा उद्रेक झाला आणि सफाळे परिसरातील पीडित जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे राहत आगरी सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष कैलास पाटील (उर्फ काका) यांच्या आक्रमक नेतृत्वाखाली टेंभीखोडावे जेटी येथे कंपनीविरोधात एक प्रचंड आणि धगधगाती निषेध मोर्चा काढण्यात आला.
बुलेट ट्रेन प्रकल्पाचे कंत्राट घेतलेल्या एल अँड टी कंपनीच्या निष्काळजी आणि बेजबाबदार कारभारामुळे विराथन बुद्रुक, टेंभीखोडावे, जलसार, मांडे, चिखलपाडा आणि किरईपाडा या गावांमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
अहोरात्र चालणाऱ्या कामांमुळे सुपीक शेतजमिनींचे नापीक धुळीत रूपांतर होत असून शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे.
जड वाहनांची अहोरात्र होणारी धडधड आणि निष्काळजीपणामुळे स्थानिकांच्या घरांचे प्रचंड नुकसान झाले असून ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

क्षमतेपेक्षा जास्त वजन वाहून नेणाऱ्या दणकट गाड्यांमुळे परिसरातील मुख्य रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून विटी लाईन या नऊ किलोमीटरच्या मुख्य रस्त्यावरील सर्व मोऱ्यांची दयनीय अवस्था होऊन त्या मोडकळीस आल्या आहेत . तसेच या संपूर्ण रस्त्यावर धुळीच्या आणि खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
प्रकल्पाच्या नावाखाली स्थानिकांना वाऱ्यावर सोडणाऱ्या आणि स्वतःचा फायदा लाटणाऱ्या कंपनीच्या या मुजोर धोरणामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.
याच जनप्रक्षोभाला वाचा फोडण्यासाठी १८ ऑगस्ट रोजी आगरी सेनेच्या वाघांनी एल अँड टी कंपनीला घेराव घालत त्यांचा तीव्र शब्दांत धिक्कार केला. कैलास पाटील (काका) यांच्या आक्रमक नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कंपनीच्या अन्यायकारक धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
“स्थानिकांचे नुकसान करून विकास साधणार असाल, तर गाठ आमच्याशी आहे. हा विकास आम्हाला मान्य नाही!” असा थेट इशारा या वेळी आंदोलकांनी कंपनी प्रशासनाला दिला.
यावेळी पालघर जिल्हा आगरी सेना प्रमुख चेतन गावड, आणि प्रदीप घरत, भूपेश घरत त्याचप्रमाणे आगरी सेनेचे इतर सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, बाधित भागातील शेतकरी, त्रस्त घरमालक आणि महिला हजारोच्या संख्येने रस्त्यावर उतरले. महिलांनी आणि शेतकऱ्यांनी थेट कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. स्थानिक प्रशासनाने आणि एल अँड टी कंपनीने त्वरित या नुकसानीची पाहणी करून बाधित शेतकऱ्यांना व घरमालकांना योग्य भरपाई द्यावी, तसेच खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुुरुस्ती करावी. अन्यथा, हे आंदोलन केवळ निषेधापुरते मर्यादित न राहता एल अँड टी कंपनीचे काम पूर्णपणे ठप्प पाडणारा तीव्र लढा उभारू, असा कडक इशारा कैलास पाटील आणि आगरी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.



