अकलूज नगरपरिषदेच्या सभेकडे सत्ताधारी नगरसेवकांची पाठ; नगराध्यक्षांच्या अजेंड्याला दाखवली केराची टोपली?३१ ऑगस्ट रोजी पुन्हा बोलावली सभा; सत्ताधारी उपस्थित राहणार का? शहराचे लक्ष

अकलूज (प्रतिनिधी):
अकलूज नगरपरिषदेची विशेष सर्वसाधारण सभा आणि सर्वसाधारण सभा मंगळवार, २५ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र, या अत्यंत महत्त्वाच्या सभेला शहरातील प्रस्थापित सत्ताधारी नगरसेवकांनी पूर्णतः पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे, या सभेला भारतीय जनता पार्टीच्या चारही नगरसेवकांनी उपस्थित राहून आपली भूमिका बजावली, तर दुसरीकडे सत्ताधारी नगरसेवकांनी मारलेल्या दांडीमुळे नगराध्यक्षांच्या अजेंड्यालाच केराची टोपली दाखविल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
सत्ताधारी नगरसेवकांच्या या अनुपस्थितीमुळे शहराच्या विविध विकास कामांवरील चर्चा पूर्णपणे ठप्प झाली असून, ही बाब नगराध्यक्षांच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचे दिसून येत आहे. नगरपरिषद कार्यालयाच्या सभागृहात आयोजित या बैठकीत शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते.

केंद्र शासन पुरस्कृत ‘अमृत २.० अभियान’अंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या कर्जाच्या अटी-शर्ती मान्य करणे व त्रिपक्षीय करारास मंजुरी देणे.
नगरपरिषद हद्दीतील मलनिसारण कामासाठी STP पंप हाऊसकरिता खाजगी जागा खरेदी करणे.
घनकचरा व्यवस्थापनासाठी कचरा डेपोकरिता खाजगी जागा भाडेतत्त्वावर घेणे.
नागरी वस्ती सुधारणा योजना (२०२६-२०२७) अंतर्गत विविध विकास कामे मंजूर करणे.
शहरातील बेकायदेशीर फ्लेक्स, बोर्ड व कट्टे काढणे यांसह तब्बल १४ हून अधिक नागरी हिताचे विषय.
एवढे महत्त्वाचे विषय अजेंड्यावर असताना सत्ताधारी नगरसेवकांनी फिरवलेली पाठ ही नगरपरिषदेतील अंतर्गत राजकीय मतभेद आणि गटबाजी चव्हाट्यावर आणणारी ठरली आहे. शहराच्या विकासाशी संबंधित विषयांवर चर्चा होऊ न शकल्याची गंभीर दखल घेत नगराध्यक्षांनी आता ही सर्वसाधारण सभा ३१ ऑगस्ट रोजी घेण्याचे योजले आहे.

त्यामुळे आता ३१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या सभेला सत्ताधारी नगरसेवक उपस्थित राहून शहराच्या विकास कामांना गती देतात की पुन्हा अनुपस्थिती दाखवतात, याकडे संपूर्ण अकलूज शहराचे लक्ष लागून राहिले आहे.



