शेतकरी एकजुटीचा मोठा विजय! आ रोहित दादा पवार यांच्या आंदोलनाला यश; मुख्यमंत्र्यांकडून कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करण्याची घोषणा

नौशाद मुलाणी संपादक Times 9 Marathi News Network
‘विठुरायाच्या आशीर्वादाने आणि शेतकरी एकजुटीच्या ताकदीमुळे’ अखेर शेतकऱ्यांच्या हक्काच्या लढ्याला मोठे यश आले आहे. विनाअट सरसकट शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी आमदार रोहित दादा पवार यांनी पंढरपूर येथे केलेले अन्नत्याग आंदोलन आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे शेतकऱ्यांनी पुकारलेल्या एल्गार लढ्यासमोर अखेर सरकारला नमावे लागले आहे.
विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत कर्जमाफी योजनेतील अत्यंत जाचक ठरणाऱ्या दोन्ही अटी रद्द करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.
सरकारने रद्द केलेल्या जाचक अटी:
दुबार लाभाची अट रद्द: २०१९ मध्ये ‘महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचा’ लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी’ योजनेतून वगळण्याची अट सरकारने आता पूर्णपणे काढून टाकली आहे.

नियमित कर्जदारांवरील अट रद्द: नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळण्यासाठी २०२५-२६ सालचे नियमित कर्ज भरण्याची जी सक्तीची अट घालण्यात आली होती, ती देखील आता रद्द करण्यात आली आहे.
“हा केवळ एका आंदोलनाचा विजय नसून, संपूर्ण शेतकरी एकजुटीचा आणि त्यांच्या न्याय्य हक्काचा विजय आहे. शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन या जाचक अटी रद्द केल्याबद्दल मी मुख्यमंत्री आणि सरकारचे मनापासून आभार मानतो.” — आमदार रोहित दादा पवार
आमदार रोहित दादा पवार यांच्या नेतृत्वात सातत्याने झालेल्या आंदोलनांमुळे अखेर सरकारने हा सकारात्मक निर्णय घेतला असून, यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना थेट मोठा दिलासा मिळाला आहे. संपूर्ण शेतकरी वर्गातून या निर्णयाचे जोरदार स्वागत होत असून “राम कृष्ण हरी!” च्या घोषात शेतकऱ्यांनी आपला आनंद साजरा केला आहे.



