योग म्हणजे शरीर, मन आणि आत्म्याचा सुंदर मिलाप: आदर्श योग शिक्षिका विद्या शिंदे

Times 9 Marathi News Network
वेळापूर: “योग म्हणजे केवळ शारीरिक व्यायाम नसून तो शरीर, मन आणि आत्म्याचा सुंदर मिलाप आहे. नियमित योगाभ्यासामुळे आपले शरीर निरोगी आणि मन शांत राहते,” असे प्रतिपादन आदर्श योग शिक्षिका विद्या शिंदे यांनी केले. वेळापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आलेल्या जागतिक योग दिन कार्यक्रमात त्या मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या.
विद्या शिंदे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून देताना सांगितले की, नियमित योगासने केल्याने विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढते, ज्याचा थेट फायदा त्यांच्या अभ्यासात होतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात योग केल्याने ताणतणाव कमी होतो आणि माणूस शारीरिक व मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत बनतो.

यावेळी उपस्थित असलेले योगशिक्षक विलास शिंदे यांनीही योगासनांचे महत्त्व विशद केले. त्यांनी केवळ मार्गदर्शनच केले नाही, तर विद्यार्थ्यांना विविध योगासनांची प्रात्यक्षिके करून दाखवली. शाळेतील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी या प्रात्यक्षिकांमध्ये उत्साहाने भाग घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात श्रीमती किरण घाडगे मॅडम यांनी केलेल्या प्रास्ताविकाने झाली. या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा करिष्मा मुलाणी, उपाध्यक्ष मनीषा भानवसे, प्रमिला बनसोडे यांच्यासह मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होता.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक युन्नूस तांबोळी, जीवन रणनवरे, श्रीमती आसराबाई जैन, पांडुरंग कुलकर्णी आणि सौ. कविता आवटे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार प्रदर्शन नितीन चव्हाण सर यांनी केले.



