डहाणू तालुक्यातील घरफोडीच्या ७ गुन्ह्यांची उकल; १४.५० लाखांचा मुद्देमालासह दोन आरोपी जेरबंद

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या घरफोडीच्या मालिकेचा छडा लावण्यात पालघर पोलिसांना यश आले आहे. घोलवड, डहाणू आणि वाणगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण सात घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणत पोलिसांनी दोन सराईत चोरट्यांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे १४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बोर्डी येथील रहिवासी सतीश शरदचंद्र बर्वे (वय ७४) यांच्या घरात २५ ते २६ मार्च २०२६ दरम्यान अज्ञात चोरट्यांनी खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून प्रवेश केला होता. घरातील कपाटे फोडून सोने-चांदीची नाणी, दागिने व रोख रक्कम असा सुमारे १ लाख ९९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला होता. याप्रकरणी घोलवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घरफोडीच्या वाढत्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथके तयार करण्यात आली. गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी हसमत अली ताहिर शेख (वय ३३) आणि अन्वर अली ताहिर शेख (वय ४१, दोघेही रा. नालासोपारा पूर्व) यांना अटक केली.
तपासादरम्यान आरोपींनी घोलवड, डहाणू आणि वाणगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण सात घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. आरोपींकडून ७ तोळे सोन्याचे दागिने, सुमारे ७ किलो चांदी, २ लाख १ हजार रुपयांची रोख रक्कम तसेच जॅग्वार कंपनीचे नळ असा एकूण १४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे आणि डहाणू विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अंकिता कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली घोलवड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे, पोलीस उपनिरीक्षक विशाल पवार, पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कृष्णा पवार, पोलीस हवालदार जे. एम. कोठारी, जे. जे. खांडवी, एच. एच. किणी, पी. एस. भोसले, डी. आर. वावरे, एस. आर. कनोजा, के. एम. शेख, पोलीस शिपाई केशव कुर्गे, पी. एस. मेस्त्री, महिला पोलीस नाईक पी. एस. राबड तसेच महिला पोलीस अंमलदार प्रमिला नारल्या आदींच्या पथकाने ही केली आहे



