महाराष्ट्र

​सोलापूर विधान परिषद निवडणूक: ६१६ पैकी ६१४ मतदारांकडून हक्क बजावत ९९.६८ % विक्रमी मतदान!

Times 9 Marathi News Network

​अकलूज : सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी बुधवारी अत्यंत उत्साहात आणि शांततेत मतदान पार पडले. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीत मतदारांनी मोठा उत्साह दाखवला असून, जिल्ह्यातील ६ मतदान केंद्रांवर एकूण ९९.६८ टक्के इतके विक्रमी मतदान झाले आहे. जिल्ह्यातील एकूण ६१६ मतदारांपैकी ६१४ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला, तर अवघे दोन मतदार मतदानापासून वंचित राहिले.
​५ केंद्रांवर १००% मतदान; ‘उत्तर सोलापूर’मध्ये किंचित घसरण

​निवडणुकीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे जिल्ह्यातील ६ पैकी तब्बल ५ मतदान केंद्रांवर १०० टक्के मतदानाची नोंद झाली. केवळ उत्तर सोलापूर केंद्रावर दोन मते कमी पडल्याने तेथील टक्केवारी ९८.९४% राहिली.

​केंद्रनिहाय मतदानाचा तपशील खालीलप्रमाणे:
मतदान केंद्र, एकूण मतदार, झालेले मतदान, मतदानाची टक्केवारी
उत्तर सोलापूर १८८ / १८६ / ९८.९४%
कुर्डूवाडी ८०/ ८० / १००%
दक्षिण सोलापूर ८९ /८९ / १००%
पंढरपूर १०० / १०० / १००%
मंगळवेढा ६२ /६२ / १००%
अकलूज ९७ / ९७ /१००%
एकूण ६१६ / ६१४ / ९९.६८%

राऊत विरुद्ध देशमुख थेट लढत; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
​या निवडणुकीत महायुतीकडून भारतीय जनता पक्षाचे (BJP) राजेंद्र राऊत आणि महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) चे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख यांच्यात थेट आणि चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.

​तथापि, राजकीय वर्तुळात ही निवडणूक केवळ दोन उमेदवारांपुरती मर्यादित नसून, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यातील प्रतिष्ठेची लढाई म्हणून पाहिली जात आहे. दोन्ही बाजूंनी आपापल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली होती.

​संख्याबळ महायुतीकडे, तरीही चुरस कायम!
​कागदावरील संख्याबळाचा विचार करता या निवडणुकीत महायुतीचे स्पष्ट वर्चस्व दिसून येत आहे. त्यामुळे भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या विजयाची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे. असे असले तरी, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी अचूक मोर्चेबांधणी करत निवडणुकीत मोठी चुरस निर्माण केल्याची जोरदार चर्चा सध्या सोलापूरच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे मविआचे वसंतराव देशमुख काही चमत्कार घडवणार का, याकडेही सर्वांचे लक्ष आहे.

​२२ जूनच्या मतमोजणीकडे राज्याचे लक्ष
संपूर्ण मतदान प्रक्रिया अत्यंत शांततेत आणि सुरळीत पार पडली असून, आता सर्वांचे डोळे २२ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहेत. राजेंद्र राऊत अपेक्षेप्रमाणे बाजी मारणार की वसंतनाना देशमुख धक्कादायक निकाल देणार? आणि विजय झाल्यास तो किती मतांच्या फरकाने होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे २२ जूनला स्पष्ट होतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button