शहर

पालघर जिल्ह्यातील सफाळे दातीवरे बीचवर देशातील पहिल्या ऑफशोअर विमानतळाची तयारी…

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक: :7030516640

पालघर जिल्ह्याच्या विकासाला नवी गती देणाऱ्या विविध रणनीतिक प्रकल्पांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. यावेळी दातीवरे बीचवरील प्रस्तावित ऑफशोअर विमानतळ, वाढवण बंदर, बुलेट ट्रेन आणि वाहतूक कॉरिडॉर प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.

दौऱ्यादरम्यान दातीवरे बीच परिसरातील प्रस्तावित ऑफशोअर विमानतळाच्या जागेची पाहणी करण्यात आली. प्राथमिक व्यवहार्यता (प्री-फिजिबिलिटी) अहवालात ही जागा विमानतळासाठी योग्य असल्याचे स्पष्ट झाल्याने संबंधित अधिकाऱ्यांना सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तातडीने तयार करण्याचे निर्देश देण्यात आले.

प्रस्तावित विमानतळ हा देशातील पहिला ऑफशोअर विमानतळ ठरणार असून त्यात दोन धावपट्ट्यांची उभारणी करण्यात येणार आहे. २०५० पर्यंत मुंबई महानगर प्रदेशातील वाढत्या हवाई वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी हा विमानतळ महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

या विमानतळाला विरार, बुलेट ट्रेन स्थानक, वाढवण बंदर, विरार-अलिबाग कॉरिडॉर तसेच राष्ट्रीय महामार्गांची प्रभावी जोड मिळणार आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्याच्या शहरी भागाला आधुनिक कनेक्टिव्हिटी मिळून उद्योग, पर्यटन, गुंतवणूक आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

यावेळी वाढवण बंदर प्रकल्पाच्या प्रगतीचाही आढावा घेण्यात आला. बंदर, बुलेट ट्रेन, विमानतळ आणि वाहतूक कॉरिडॉर या सर्व प्रकल्पांची समन्वित अंमलबजावणी करून पालघरला देशातील महत्त्वाचे आर्थिक व लॉजिस्टिक केंद्र म्हणून विकसित करण्याचे नियोजन असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

डीपीआर पूर्ण झाल्यानंतर आवश्यक मंजुरी, पायाभूत सुविधा विकास, जमीन संपादन आणि वाहतूक नियोजनाच्या कामांना गती देण्यात येणार असून, या सर्व प्रकल्पांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे पालघर जिल्ह्याच्या आर्थिक आणि शहरी विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला.

यावेळी पालकमंत्री गणेश नाईक, मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे, जिल्हा अध्यक्ष भरत राजपूत व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button