परवानगी नाकारली तरी पंढरपुरात ‘अन्नत्याग आंदोलन’ होणारच; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलक ठाम!

Times 9 Marathi News Network
पंढरपूर:शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठीच्या जाचक अटी व शर्ती रद्द कराव्यात या मागणीसाठी पंढरपुरात होणाऱ्या अन्नत्याग आंदोलनाला अवघे ३६ तास उरले असताना, प्रशासनाने ट्रॅफिकचे (वाहतूक कोंडी) कारण पुढे करत परवानगी नाकारली आहे. प्रशासनाचा हा निर्णय म्हणजे आंदोलनाला अडथळा आणण्याचा सरकारचा प्रयत्न असून, हा निव्वळ ‘भेकडपणा’ आहे, अशी घणाघाती टीका आंदोलनकर्त्यांनी केली आहे. मात्र, प्रशासनाने परवानगी दिली किंवा नाही दिली, तरी ठरलेल्या तारीख, वेळ आणि ठिकाणानुसार आंदोलन होणारच, असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.
भाविकांची काळजी घेऊन जागा बदलली; तरीही प्रशासनाची अडवणूक आंदोलक म्हणाले की, “वास्तविक पाहता आम्ही संत नामदेव पायरीजवळही आंदोलन करू शकलो असतो. परंतु, पंढरपुरात येणाऱ्या विठ्ठल भक्तांना आणि भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये, या सामाजिक जाणिवेतून आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एका कोपऱ्यात आंदोलन करण्याचे निश्चित केले आहे.”

वाहतूक कोंडी आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नच नाही!
प्रशासनाच्या ट्रॅफिकच्या कारणावर आक्षेप घेताना आंदोलकांनी स्पष्ट केले की, हे आंदोलन पंढरीचा वारकरी असलेल्या शेतकऱ्यांसाठीचा लढा आहे. आंदोलनस्थळी कुणाचीही कोणतीही वाहने येणार नाहीत. संपूर्ण आंदोलन शांततापूर्ण मार्गाने आणि ‘अन्नत्याग’ करून केले जाणार आहे. त्यामुळे येथे कायदा व सुव्यवस्थेचा किंवा ट्रॅफिकचा कोणताही प्रश्न उद्भवत नाही. प्रशासनाने आमची नाहक अडवणूक करण्यापेक्षा शेतकऱ्यांमधील तीव्र संताप सरकारपर्यंत पोहोचवावा, असा सल्लाही यावेळी देण्यात आला.
”पण आता थांबणार नाही…!”
“अन्नदात्या शेतकऱ्यांसाठी आमची तारीख, वेळ आणि ठिकाण ठरलेले आहे. सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक थांबवावी. कर्जमाफीसाठीच्या जाचक अटी व शर्ती जोपर्यंत रद्द केल्या जात नाहीत, तोपर्यंत एक पाऊलही मागे हटणार नाही,” असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
प्रशासनाच्या या भूमिकेमुळे आता पंढरपुरातील वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता असून, आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने सरकार आणि प्रशासन काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



