अकलूजकरांनो पाणी जपून वापरा! पाणी पुरवठ्यात बदल; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट नळ कनेक्शन कट होणार

Times 9 Marathi News Network
अकलूज: अकलूज नगरपरिषद साठवण तलावात पाटबंधारे विभागाकडून पाणी उशिरा मिळणार असल्याने, उपलब्ध पाणी साठा पुढील पाणी मिळेपर्यंत पुरवणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर अकलूज नगरपरिषद प्रशासनाने शहराच्या पाणी पुरवठ्यात मोठा बदल केला असून पाणी बचतीसाठी कडक नियमावली जाहीर केली आहे. नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा आणि पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी केले आहे.
🛑 असा असेल पाणी पुरवठ्याचा नवा वेळापत्रक
पाटबंधारे विभागाच्या पत्रानुसार पाणी उशिरा उपलब्ध होणार असल्याने बुधवारपासून शहरात चार दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे.
पहिला भाग: बुधवार, दिनांक १७ जून २०२६ पासून पहिल्या भागात दर चार दिवसाआड एक वेळ सकाळी नियमित वेळेप्रमाणे पाणी पुरवठा केला जाईल.
दुसरा भाग: गुरुवार, दिनांक १८ जून २०२६ पासून दुसऱ्या भागात दर चार दिवसाआड एक वेळ सकाळी नियमित वेळेप्रमाणे पाणी पुरवठा केला जाईल.

⚠️ नियम मोडल्यास थेट कारवाई; नळ कनेक्शन होणार खंडित!
पाण्याची टंचाई आणि संभाव्य टंचाई लक्षात घेता नगरपरिषदेने पाणी पुरवठा कनेक्शन धारकांसाठी अत्यंत कडक सूचना जारी केल्या आहेत:
१. नळाला तोटी (टॅप) लावणे बंधनकारक: सर्व नळधारकांनी आपल्या नळाला तातडीने तोटी लावून घ्यावी. ज्या नळधारकांनी तोटी लावली नसेल, त्यांचे नळ कनेक्शन त्वरित कट केले जाईल.
२. पाण्याचा अपव्यय केल्यास दंड: नळाच्या पाण्याने गाड्या धुणे, अंगणात व रस्त्यावर पाणी मारणे, किंवा नळाचे पाणी थेट नालीमध्ये (गटारात) सोडून देणे यांसारख्या गोष्टी करताना कोणी आढळल्यास गंभीर दखल घेतली जाईल.
३. थेट फौजदारी/दंडात्मक कारवाई: पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांचे नळ कनेक्शन खंडित तर केले जाईलच, शिवाय संबंधित घरमालकावर दंडात्मक कारवाई देखील करण्यात येईल.
मुख्याधिकाऱ्यांचे आवाहन: > “उपलब्ध पाणी साठा पुढील आवर्तन येईपर्यंत पुरवणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्व अकलूजकर नागरिकांनी उपलब्ध पाणी अत्यंत काटकसरीने वापरावे आणि नगरपरिषदेला सहकार्य करावे.”
— सचिन पाटील (मुख्याधिकारी अकलूज नगरपरिषद)



