डहाणू आंबिवली सोमनपाडा येथे भीषण अपघात…. एका तरुणीचा जागीच मृत्यू,…6 जणी गंभीर जखमी

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
डहाणू तालुक्यातील आंबिवली सोमनपाडा परिसरात शनिवार दिनांक १९ जुलै रोजी सायंकाळी सातच्या सुमारास इको गाडीच्या अपघातात एका तरुण मुलीचा जागीच मृत्यू झाला असून अन्य सहाजणी गंभीर रित्या जखमी झाल्या आहेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .
MH48-BT-3455 या इको गाडीतून अच्छाड येथून घरी परत येत असताना हा अपघात झाला आहे.
या गाडीमध्ये एकूण सात तरुणी प्रवास करत होत्या चिखलमय रस्त्यावर ताबा सुटून ही इको गाडी झाडावर आदळली. या अपघातात अंजली रघुनाथ काकरा (वय अंदाजे २३) या तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून इतर सहा तरुणी गंभीर जखमी झाल्या आहेत.
अपघातग्रस्त गाडी ही निकणे येथील सायवन देसक यांची आहे. या गाडीत अच्छाड येथे मजुरीचे काम करून परत येणाऱ्या सात तरुणी होत्या. रस्ता अत्यंत खराब, चिखलमय आणि घसरडा असल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी थेट झाडावर आदळली. अपघाताची तीव्रता इतकी होती की गाडीच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे.
अपघात होताच स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ मदती साठी धाव घेतली. सर्व जखमींना तातडीने कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील दोन मुलींना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून, उर्वरित चार जणींवर वेदांत रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघातामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे. आंबिवली–सारणी मार्गावरील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय असून त्याकडे प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष केलं जात आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही रस्त्यांची डागडुजी किंवा डांबरीकरण झालेले नाही अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.



