संपादकीय

वीर योद्धा फकिरा जयंती निमित्त – इथल्या प्रत्येक काळजात “फकिरा “पेरला पाहिजे लेखक -महेश कोळेकर

टाइम्स 9 मराठी न्युज

“छत्रपती शिवाजी महाराजांनी ही तलवार माझ्या पूर्वज्यांना दिली होती” आता तीच तलवार घेऊन मी या जुलमी इंग्रज सत्तेच्या विरोधात लढणार अस ठणकावून सांगणारा “फकिरा” म्हणजे वाटेगाव ता. वाळवा जि. सांगली चा ढाण्या वाघ फकिरा राणोजी साठे होय. अशा या वीर योध्याच्या आज १ मार्च रोजी जयंती दिनी माझा मानाचा मुजरा. लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या “फकिरा” कादंबरी मधून “फकिरा” या नायकाची कलाकृती अजरामर केली.

इंग्रजांची भर दिवसा धान्याची कोठारे लुटून सामान्य जनतेची भूक भागविणारा म्हणजे फकिरा. फक्त माणूस आणि माणसासाठी च शस्त्र उचलणारा माणुसकीचा माणूस म्हणजे वीर योद्धा फकिरा. तरुणांच्या हातात बंदुका देऊन देशासाठी लढण्यास, सामान्य जनतेच्या न्यायहक्कांसाठी झुंजण्यास बळ देणारा वीर म्हणजे “फकिरा”. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी फकिरा या कादंबरीतून फकिरा चे संघर्षमय जीवन रेखाटले आहे. खरच आजकाल कोणालाही फकिरा नाही होता येत. फकिरा व्हायला त्या तिरंग्याची मनात आग पाहिजे अन्यायअत्याचार विरुध्द मनात राग पाहिजे.

आणि त्यासाठी “फकिरा” च्या क्रांतिकारी विचारांनी प्रेरित झालेला वाघ पाहिजे. तेव्हा येत फकिरा व्हायला. फकिरा असाच नाही तयार होत. त्यासाठी आधी माणूस समजून घ्यावा लागतो. फकिराने फक्त माणूस जपला आणि प्रत्येक माणूस भारत मातेच्या सेवेसाठी झुपला. इंग्रजांच्या विरुद्ध मोठी तरुणांची फौज निर्माण केली. ते पण सशस्त्र सेना च उभी केली. फकिरा इथल्या प्रत्येक घरात जन्माला यायला हवा यासाठी आपण वीर फकिरा ची यशोगाथा वाचायला हवी. समजून घ्यायला हवी.

कोण होता फकिरा, कसा होता फकिरा, काय होता फकिरा, काय करत होता फकिरा, या सर्व प्रश्नांची उत्तरे फक्त आपल्याला एकच कादंबरी देऊ शकते ती म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित “फकिरा”. जो माणूस फकिरा वाचतो तो फकिरा झाल्याशिवाय राहत नाही. देशासाठी जगायला आणि देशासाठी मरायला ही काळीज लागत वाघाचं, धन्य त्या वाटेगावच्या मातीच नशीब जिथं पाऊल पडलं फकिराच. वाटेगाव मध्ये वीर योद्धा फकिरा ची समाधी आहे पण ती अगदी साध्या स्वरूपात आहे.

मी लेखक , इतिहासप्रेमी या नात्याने सरकार कडे विनंती करतो की, अशा महान फकिरा योद्धा च्या नावाने तिथे चांगले इतिहासाचे दर्शन देणारे त्यांचे स्मारक उभे करावे आणि समाधी स्थळ ही उभे करण्यात यावे. की, जेणेकरून येणाऱ्या पिढीला कळेल की, आपणही “फकिरा” झालं पाहिजे. खरा फकिरा सर्वांना कळला पाहिजे. या भारत देशात पुन्हा एकदा वीर “फकिरा” जन्माला यायला पाहिजे. असा या थोर क्रांतिकारकास माझा मानाचा मुजरा. इंग्रजांच्या छाताडावर गोळ्या घालून त्यांची मुंडकी धडावेगळी करणारा हा शूरवीर योद्धा म्हणजे “फकिरा”. सळसळत्या रक्ताचा उसळत्या क्रांतिकारी विचारांचा देशभक्त म्हणजे वीर फकिरा. अन्याय अत्याचाराला वाचा फोडणारा म्हणजे फकिरा. तरुणांच्या मनात देशप्रेमाची आग निर्माण करणारा म्हणजे वीर ” फकिरा”.

एक जिवंत आणि ज्वलंत विचार म्हणजे “फकिरा”. स्वतः उपाशी राहून आयाबहिणींची, लहान पोराबाळांची पोट भरणारा भूक भागविणारा माणुसकीचा माणूस म्हणजे फकिरा. इंग्रजांच्या तिरडीचा बांबू मोडणारा ढाण्या वाघ म्हणजे “फकिरा.” तत्कालीन काळामध्ये सर्व युद्ध कौशल्यात निपुन तेज तरबेज असणारा शूरवीर योद्धा म्हणजे “फकिरा.” फकिरच्या प्रत्येक पावलावर इंग्रज टपून होते. पण त्या इंग्रजांचे बाप पण वीर फकिरा ला भिऊन होते. मी फासावर गेल्याने जर बाकीचा समाज , आयाबहिणीं, लेकरं बाळ सुखात राहणार असतील तर मी हसत हसत फासावर जायला तयार आहे असं छाती ठोकून सांगणारा वीर म्हणजे “फकिरा.”

एक क्रांतिकारी विचारांनी प्रेरित झालेला फकिरा आज पुन्हा एकदा प्रत्येक घरात जन्माला यायला पाहिजे. एक सांगू ” फकिरा” अजूनही अजराअमर आहे लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या “फकिरा” या कादंबरीत. पण दुर्दैव आपल्या सर्वांचे नेहमीप्रमाणे इतिहासाने या वीर फकिरा ला सुद्धा बेदखल केलं. पण आपण सर्वांनी फकिरा ला आपल्या काळजात पेरलं पाहिजे. कारण उगवणारा प्रत्येक मोड हा भारत मातेचा असेल, भारत मातेसाठी असेल….जय हिंद. भारत माता की जय.

लेखक- महेश बजरंग कोळेकर
रा-काक्रंबावाडी ता.तुळजापूर जि. धाराशिव.
संपर्क-9579228347

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button