संपादकीय

विषय माढा विधानसभेचा…!

खास वाचकांच्या आग्रहात्सव विशेष अग्रलेख…

जशी लोकसभेची निवडणूक पार पडली आहे तेव्हापासून महाराष्ट्रातील महायुतीच्या कळपामध्ये धडकी भरली असल्याचे पाहायला मिळत आहे,सोलापूर जिल्ह्यात तर महायुतीची काय परिस्थिती आहे हे न सांगण्याच्या पलीकडे,सोलापूर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी विजयी झाली सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे तर माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील विजयी झाले…

प्रणिती ताई शिंदे ह्या लोकसभा निवडणूकीत उमेदवार असल्यामुळे तत्कालीन राजकीय परिस्थितीचा अंदाज घेत सुशीलकुमार शिंदे यांनी अकलूज गाठले होते म्हणूनच याचा परिणाम असा झाला की, मोहिते पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी एका रात्रीत आमदार केलेल्या राम सातपुते यांचे पार्सल सोलापुरकरांनी बीडला पाठवले,तर इकडे मोहिते पाटील यांच्याच वरद हस्ताने खासदार झालेले रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मात देत धैर्यशील मोहिते पाटील संसद भवनात दाखल झाले…

आणि इथूनच सोलापूर जिल्ह्याचे राजकीय समीकरण बदलले साखर कारखानदारीच्या माध्यमातून गेली तीस वर्षे माढा विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करणारे आमदार बबनराव शिंदे यांचे सोलापूर जिल्ह्यावर वर्चस्व मिळवण्याचे स्वप्न अखेर दिवा स्वप्न च ठरले…

दरम्यान काळात बबनराव शिंदे यांनी माजी आमदार विठ्ठलराव शिंदे यांच्या पुरोगामी विचारांना “तिलांजली” देत अजित दादा पवार यांच्या सह भाजपा सारख्या जातीय ध्येय धोरणांची गोळा बेरीज करणाऱ्या भाजपा सारख्या पक्षाच्या पंगतीला जाऊन बसले आणि इथेच बबनराव शिंदे यांचे गणित चुकले म्हणायला हरकत नाही…

नुसत्या साखर कारखानदारीच्या माध्यमातून जनतेचा विकास साधता येतो असे म्हणत बबनराव शिंदे यांनी सलग तीस वर्षे माढा तालुक्याची सत्ता भोगली,परंतु टेंभुर्णी,कुर्डूवाडी,मोडनिंब येथील बस स्थानकाला एक नवी कोरी विट सुध्दा बबनराव शिंदे यांच्या कारकिर्दीत बसली नाही,तसेच मागासवर्गीयांसाठी स्थापन झालेल्या सुत गिरणीचा विषय हि ऐरणीवरच राहिल्याचे दिसला,हे माढा तालुक्यातील जनतेचे दुर्दैव च म्हणावे लागेल…

माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये आजच्या घडीला बबनराव शिंदे यांच्या कारखान्यावरील उसाचा काटा सुद्धा संशयाच्या बोहऱ्यात सापडला परंतु माढा तालुक्यातील रस्त्याचा प्रश्न,माढा-टेंभुर्णी-मोडनिंब या मोठ्या बाजारपेठ असलेल्या ठिकाणचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच माढा विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील सुस्ते या गावाजवळ च्या बंधाऱ्याचा प्रश्न कधी सोडवायचा देखील प्रयत्न बबनराव शिंदे यांनी केला नाही असे जनतेचे म्हणणे आहे….

सुस्ते येथील तो बंधारा तर आमदार बबनराव शिंदे हे गेली 15 वर्ष झाले बांधून देतो म्हणत तिथे नुसते मताचे राजकारण करत आहेत असा स्थानिक जनतेचा आरोप आहे,बाकीची हरित क्रांती आणि धवल क्रांती चा तर विषय न काढलेलाच बरा…

टेंभुर्णीच्या एमआयडीसीमध्ये काय आणि कसे राजकारण होते यावरही आता जनता बोलू लागली आहे बबनराव शिंदे यांनी आतापर्यंत साखर कारखानदारीच्या माध्यमातून तालुक्यात राजकारण केले असून शैक्षणिक,सांस्कृतिक,पर्यटन विकास आणि आरोग्य सेवेच्या बाबतीत मात्र तालुका मात्र कोरडा कडकडीत ठेवला आहे असे हि जनतेतून बोलले जात आहे…

सातत्याने गेली तीस वर्षे अबाधित सत्ता भोगून देखील बबनराव शिंदे अजून सुद्धा जनतेसाठी मूलभूत गरजांच्या दृष्टिकोनातून माढा तालुक्यातील जनतेकडे पाहिलेलेच नाही आणि साखर कारखानदारीच्या माध्यमातून फक्त आणि फक्त आपल्या स्वकियांचा विकास साधला असा सुद्धा आरोप जनता आता करू लागलेली आहे,माढा तालुक्यातील जनता आरोग्य सेवे साठी अकलूज,सोलापूर,पुणे येथे पायपीट करत आहे,या गोष्टीचे बबनराव शिंदे यांनी जरूर उत्तर द्यावे की, त्यांनी तीस वर्षात एखादे तरी मोठे हॉस्पिटल माढा तालुक्यासाठी आणले किंवा बांधून दाखवले…

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सह गेलेले अजित दादा पवार यांच्यामुळे बबनराव शिंदे यांची ही निबार गोची झाली असून आपले सुपुत्र रणजितसिंह शिंदे यांना बरोबर घेत बड्या बड्या नेत्यांची दारे ठोठावत फिरताना सुद्धा बबनराव शिंदे दिसत आहेत…

तर इकडे विठ्ठल परिवाराचे अभिजित पाटील यांनी हि “हम भी कुछ कम नहीं है” म्हणत “कहानी में नया ट्विस्ट” आणल्याचे पहायला मिळत आहे…

अभिजित पाटील यांनी तर बबनराव शिंदे यांच्या पुढे एक पाऊल जास्त टाकत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा 3500 रूपये दर जाहीर करून सबंध माढा विधानसभेची घडी इसकटण्याचा प्रयत्न केला असुन अशा मध्ये बबनराव शिंदे यांनी जर विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचा यंदाचा साखर दर अभिजित पाटील यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्या पेक्षा जास्त दिला तर यात वावगे वाटण्याचे कारण नाही परंतु “नुसत्या साखर कारखानदारीच्या माध्यमातून जनतेचा विकास साधता येत नाही” हे ह्या दोन्हीं नेत्यांना जाऊन कोण सांगणार…? हा प्रश्न देखील उपस्थित होतो…असो..

याच्यावरून एकंदरीत पणे माढा तालुक्यातील जनतेनेही आता बबनराव शिंदे यांना चांगलेच ओळखले असुन माढा तालुक्यातील जनता आता “बदल हवा आमदार नवा” च्या प्रतीक्षेत आहेत,या दरम्यान लोकसभा निवडणुकीत माढा तालुक्याची एक हाती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणारे शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी माढा तालुका अक्षरशः तीन वेळा पिंजून काढल्या सारखा काढला असुन माढा तालुका विधानसभेची निवडणूक लढवायचीच हा दृष्टिकोन बाळगत लोकसभेच्या वेळी धैर्यशील मोहिते पाटील यांना आतून आणि उघडपणे साथ देणाऱ्या कार्यकर्त्यांना विश्वासाने बरोबर घेत विधानसभेची ते तयारी करत आहेत…

अशातच ॲड मिनलताई साठे,संजय कोकाटे,शिवाजी (नाना) कांबळे, यांच्या सुध्दा नावाची दबक्या आवाजात चर्चा सुरु असुन धनराज शिंदे हे विधानसभे पर्यंत काय भुमिका घेतात या कडे हि सगळ्यांचे लक्ष लागले आहे…

अगदी गेल्याच आठवड्यात टेंभुर्णी येथील राजकारणातील बडे प्रस्थ समजले जाणारे रावसाहेब नाना देशमुख हे आणि सुरज भैय्या देशमुख यांनी दहीहंडी सारख्या भव्य कार्यक्रमात प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि माढा चे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत “तुतारी” वाजवली…

भविष्यात माढा तालुक्यातील असे अनेक युवा कार्यकर्ते जे बबनराव शिंदे यांच्या वर नाराज आहेत त्यांनी तुतारी वाजवली तर नवल वाटण्याचे कारण नाही,असे अनेक युवा कार्यकर्ते आपल्या विरोधात उभे राहतील अशी परिस्थिती माढा तालुक्यात स्वतः बबनराव शिंदे यांनीच निर्माण केली असून त्याचा फटका येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांनाच बसणार हे मात्र तितकेच खरे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button