क्राईम

माळशिरस पंचायत समितीचा वरिष्ठ सहाय्यक ५ हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

​माळशिरस: कामाचा दाखला देण्यासाठी १० हजारांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती ५ हजार रुपये स्वीकारताना माळशिरस पंचायत समितीतील वरिष्ठ सहाय्यक सुंदरराव नागटिळक (वय ५६) यांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सोमवारी रंगेहात पकडले. या कारवाईमुळे पंचायत समिती वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

​तक्रारदार यांनी धर्मपुरी येथे एका सभा मंडपाचे काम पूर्ण केले होते. या कामाचे बिल त्यांनी सोलापूर कार्यालयाकडे सादर केले होते. सोलापूरहून हे बिल माळशिरस पंचायत समितीकडे वर्ग करण्यात आले. सदर काम पूर्ण झाल्याचा दाखला गटविकास अधिकाऱ्यांकडून (BDO) मिळवून देण्यासाठी वरिष्ठ सहाय्यक सुंदरराव नागटिळक यांनी तक्रारदाराकडे १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

​लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदाराने पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यानुसार, सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास पंचायत समिती कार्यालयात सापळा रचण्यात आला. तडजोडीनंतर ठरलेली ५ हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना नागटिळक यांना पथकाने रंगेहात ताब्यात घेतले.

​महत्त्वाची नोंद: या प्रकरणात गटविकास अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही पडताळणी करण्यात आली, मात्र त्यात त्यांचा कोणताही सहभाग आढळून आला नाही.

​सदर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण करून हे प्रकरण पुढील तपासासाठी सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे वर्ग करण्यात येणार आहे.

ही यशस्वी कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे, महिला पोलीस कॉन्स्टेबल माकर, पोलीस कॉन्स्टेबल तावरे, कुमकर आणि चालक दिवेकर यांच्या पथकाने केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button