ॲड. नाझ शेख यांना प्रतिष्ठित “राष्ट्रीय रत्न पुरस्कार २०२६” जाहीर. छत्रपती संभाजीनगर येथे २१ सप्टेंबरला भव्य सोहळ्यात होणार सन्मान; राजकीय, सामाजिक अन् कायदेशीर क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव

Times 9 Marathi News Network
नांदेड : महाराष्ट्रातील ख्यातनाम वकील व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) नेत्या ॲड. नाझ शेख यांना या वर्षीचा प्रतिष्ठित “राष्ट्रीय रत्न पुरस्कार २०२६” जाहीर झाला आहे. आगामी २१ सप्टेंबर २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित एका विशेष दिमाखदार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘टाइम्स ९’ च्या सूत्रांनी दिली आहे.
विद्यार्थीदशेपासूनच समाजकारणाची आवड असलेल्या ॲड. नाझ शेख या दीर्घकाळापासून विविध सामाजिक उपक्रमांत अत्यंत सक्रिय आहेत. कायदेशीर शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या सध्या नांदेड जिल्हा व सत्र न्यायालयात वकील म्हणून कार्यरत आहेत. या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य, गरीब आणि गरजूंना मोफत व योग्य कायदेशीर मदत पुरवण्याचे मोलाचे कार्य केले आहे. आपल्या या कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रात एक वेगळी आणि कणखर ओळख निर्माण केली आहे.
त्यांच्या या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेऊन ‘सातारा मीडिया चॅरिटेबल फाउंडेशन (ऑल इंडिया)’ आणि ‘जनसहयोग सेवाभावी संस्था’ यांच्या संयुक्त विद्यमाने या पुरस्काराची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा २१ सप्टेंबर २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथील “भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद रिसर्च सेंटर” येथे पार पडणार आहे.
“हा सन्मान माझ्या पाठीशी उभे राहणाऱ्या प्रत्येकाचा!”
या यशाबद्दल भावना व्यक्त करताना ॲड. नाझ शेख म्हणाल्या, “हा सन्मान केवळ माझा एकटीचा नसून माझे आई-वडील, पती, कुटुंब आणि मला नेहमी मार्गदर्शन करणाऱ्या वरिष्ठ गुरूंचा आहे. तसेच माझ्या कार्याला सोशल मीडिया व वृत्तपत्रांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या सर्व पत्रकार बांधवांची मी मनापासून आभारी आहे. जनतेचे हेच प्रेम आणि आशीर्वाद मला भविष्यात आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा देतात.”
ॲड. नाझ शेख यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याचे समजताच नांदेडसह संपूर्ण राज्यभरातील राजकीय, सामाजिक व कायदेशीर क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या आनंदवार्तेनंतर ‘टाइम्स ९’ चे अकलूज प्रतिनिधी आमीर मोहोळकर यांनीही ॲड. नाझ शेख यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधत त्यांना या यशाबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.



