केळवा सागरी पोलिसांची तत्परता….अवघ्या काही तासांत मुलांची सुखरूप सुटका

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
पालघर जिल्ह्यातील केळवा बीच येथे गणेश विसर्जनासाठी जमलेल्या प्रचंड गर्दीत हरवलेल्या दोन चिमुकल्यांना केळवा सागरी पोलिसांनी तत्परता दाखवत शोधून काढले आहे . अवघ्या ४ ते ५ वर्षे वयाच्या या दोन्ही मुलांना पोलिसांनी सुखरूप त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले. पोलिसांच्या या कार्यतत्परतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
मंगळवारी (दि. १५ सप्टेंबर) सायंकाळी सुमारे ७ वाजता केळवा बीच येथे दीड दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. याच गर्दीत गस्त घालत असताना केळवा सागरी पोलिसांना एक मुलगा आणि एक मुलगी हरवलेल्या अवस्थेत आढळून आले.

पोलिसांनी दोन्ही चिमुकल्यांकडे चौकशी केली असता त्यांनी आपली नावे सांगितली. मात्र, आई-वडिलांची नावे, पत्ता किंवा अन्य माहिती सांगता येत नसल्याने पोलिसांसमोर त्यांना पालकांपर्यंत पोहोचविण्याचे आव्हान निर्माण झाले होते .
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून केळवा पोलिसांनी तातडीने मुलांच्या पालकांचा शोध सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तसेच, मुलांची छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसारित करून नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले होते .
या प्रयत्नांना अखेर यश आले आणि दोन्ही मुले पालघर तालुक्यातील गांधी नगर परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर केळवा सागरी पोलिसांच्या पथकाने तातडीने गांधी नगर येथे जाऊन मुलांच्या पालकांची प्रत्यक्ष भेट घेतली. दोन्ही चिमुकल्यांना सुखरूप त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले.


गणेशोत्सवाच्या गर्दीत लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी, मुलांना गर्दीत एकटे सोडू नये आणि मुले हरवल्यास तातडीने जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन केळवा सागरी पोलीस ठाणे सहायक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी यांच्याकडून करण्यात आले आहे.



