शहर

बुलेट ट्रेनच्या कामाने गावकऱ्यांच्या अडचणी वाढल्या; पालघरमध्ये अधिकाऱ्यांसमोर शेतकरी-ग्रामस्थांचा आक्रोशपाणी, शेतजमिनींचा मोबदला, घरांचे नुकसान, रस्ते आणि मंदिराच्या नुकसानीसह जिल्हा परिषद शाळेतील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640

बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामामुळे विटी लाईन परिसरातील विराथन बुद्रुक, विठ्ठलवाडी, जलसार आणि टेंभीखोडावे या गावांतील शेतकरी व ग्रामस्थांच्या अडचणी दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचा आरोप करत सोमवारी पालघर डीवायएसपी कार्यालयात प्रशासन आणि संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांसमोर संतप्त ग्रामस्थांनी विविध प्रश्नांचा पाढाच वाचला.

आगरी सेना महाराष्ट्राचे उपाध्यक्ष कैलास पाटील आणि पालघर आगरी सेनेचे अध्यक्ष चेतन गावड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत प्रांत अधिकारी तसेच पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

चार ग्रामपंचायतींच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा बैठकीतील प्रमुख मुद्दा ठरला. टेंभीखोडावे येथील तब्बल ४० वर्षे जुनी आणि संपूर्ण गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीला तडे गेल्याने ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रकल्पाच्या कामामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

याशिवाय बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या शेतजमिनींचा योग्य मोबदला, शेतजमिनी व घरांचे झालेले नुकसान आणि त्याची भरपाई याबाबतही ग्रामस्थांनी प्रशासनाकडे ठोस भूमिका घेण्याची मागणी केली.

भुसुरुंग स्फोटाने पुरातन मेघराज मंदिराचे नुकसान?

बुलेट ट्रेनच्या कामासाठी करण्यात आलेल्या अति क्षमतेच्या भुसुरुंग स्फोटांमुळे पुरातन मेघराज मंदिराचे नुकसान झाल्याचा गंभीर आरोप बैठकीत करण्यात आला. धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या मंदिराच्या नुकसानीची पाहणी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

दरम्यान, प्रकल्पाचे काम करणाऱ्या एल अँड टी कंपनीच्या अति जड वाहनांच्या वाहतुकीमुळे परिसरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. अनेक ठिकाणी रस्ते तुटण्याच्या मार्गावर असून, मोऱ्यांचीही दुरवस्था झाल्याचे बैठकीत निदर्शनास आणून देण्यात आले. जड वाहनांच्या वाहतुकीमुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.

दोन कोटी १८ लाखांच्या शाळेच्या इमारतीवरही प्रश्नचिन्ह

टेंभीखोडावे येथे जिल्हा परिषदेमार्फत सुमारे दोन कोटी १८ लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या नवीन शाळेच्या इमारतीत कथित भ्रष्टाचार झाल्याचा मुद्दाही बैठकीत उपस्थित करण्यात आला. बांधकामाच्या दर्जाबाबत आणि झालेल्या खर्चाबाबत चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.

बैठकीला पालघर उपविभागीय अधिकारी तथा प्रांत अधिकारी श्याम मदनुरकर, पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश गवळी, केळवे सागरी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी, तसेच एल अँड टी कंपनीचे अधिकारी ओंकार ठाकूर,टेंभीखोडावेच्या सरपंच शोभा कमलाकर पाटील यांच्यासह बाधित शेतकरी, ग्रामस्थ आणि आगरी सेनेचे पदाधिकारी प्रदीप घरत, दत्तात्रय पाटील, परशुराम भोईर, भूपेश घरत, महेश घरत, प्रणय पाटील आणि प्रकाश गावड उपस्थित होते.

बुलेट ट्रेन प्रकल्प हा विकासाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असला, तरी या विकासाच्या नावाखाली स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांच्या मूलभूत हक्कांकडे दुर्लक्ष होणार नाही, याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी, अशी ठाम भूमिका बैठकीत मांडण्यात आली. आता बैठकीतील मागण्यांवर प्रशासन आणि संबंधित कंपनी कोणती ठोस कार्यवाही करते, याकडे चारही गावांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button