शहर

पालघर जिल्ह्यातील सूर्या नदीवर गणेश विसर्जनावेळी दुर्दैवी दुर्घटना..१७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू… तिघांना वाचवण्यात यश

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक: 7030516640

डहाणू तालुक्यातील कासा येथे रविवार २० सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनादरम्यान एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सूर्या नदीच्या विसर्जन घाटावर गणेशमूर्तीचे विसर्जन करताना शिवराज गवळी (वय १७) या तरुणाचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत बुडणाऱ्या अन्य तीन भाविकांना स्थानिक जीवरक्षक आणि पोलिसांनी वेळेवर बाहेर काढल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत.

रविवारी विसर्जन मिरवणूक आटोपल्यानंतर १२.३० वाजेच्या सुमारास चारोटी नाका येथील ‘लोहार मित्र मंडळा’ची सुमारे सहा फूट उंचीची गणेशमूर्ती विसर्जनासाठी सूर्या नदीवर आणली गेली होती. विसर्जन करत असताना काही भाविक मूर्तीसह नदीच्या खोल पात्रात गेले. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अचानक चार ते पाच जण पाण्यात बुडू लागले. किनाऱ्यावर तैनात असलेले ग्रामपंचायतीचे सुरक्षा कर्मचारी, पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ बचावकार्य हाती घेतले. त्यांनी तातडीने तिघांना पाण्याबाहेर काढले, मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने शिवराज गवळी हा खोल पाण्यात वाहून गेला.

रात्रीच्या अंधारामुळे शोधकार्यात अडथळे येत होते. सुमारे ३ ते ४ तास शोध घेऊनही शिवराजचा काहीच पत्ता लागला नाही. अखेर सोमवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली आणि सकाळी १० वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात यश आले. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. एन विसर्जन सोहळ्यात घडलेल्या या दुर्घटनेमुळे चारोटी नाका व कासा परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button