अकलूजचा ‘हिंदू-मुस्लिम’ एकतेचा मानबिंदू: सुरेशभाऊ गंभीरे सलग ३२ व्या वर्षी पाळतायत रमजानचे रोजे!

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
अकलूज : सध्याच्या काळात जिथे धर्माच्या नावाने भिंती उभ्या केल्या जात आहेत, तिथे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील अकलूजमध्ये माणुसकी आणि धार्मिक सौहार्दाचे एक आगळेवेगळे उदाहरण पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अकलूज शहराध्यक्ष सुरेश शिवाजी गंभीरे हे गेली ३१ वर्षे अविरतपणे पवित्र रमजान महिन्याचे उपवास (रोजे) करत असून, यंदा त्यांचे हे ३२ वे वर्ष आहे.

सुरेश भाऊ गंभीरे यांची ही साधना केवळ उपवासापुरती मर्यादित नाही. गेली तीन दशके ते दररोज पहाटे ४ वाजता उठून मुस्लिम बांधवांना ‘सहरी’साठी उठवण्याचे काम करतात. त्यांच्या या उपवासाची पद्धतही अत्यंत साधी आणि सात्विक आहे. पहाटे सहरीच्या वेळी केवळ एक खजूर आणि एक प्याला दही सेवन करून ते दिवसभराचा कडक उपवास धरतात.भक्ती आणि शिस्तीचा अनोखा संगम या ठिकाणी पाहायला मिळतो.

केवळ उपवासच नाही, तर मुस्लिम बांधवांमध्ये उपवास सोडताना (इफ्तारच्या वेळी) जे मंत्र पठण किंवा दुआ केली जाते, ती सुरेश भाऊंना पूर्णपणे तोंडपाठ आहे. मुस्लिम धर्मियांच्या रीतीरिवाजांचा अत्यंत आदर करत ते संध्याकाळी विधिवत आपला रोजा सोडतात. त्यांच्या या श्रद्धेमुळे संपूर्ण परिसरात ते हिंदू-मुस्लिम एकात्मतेचे जिवंत प्रतीक बनले आहेत.

”धर्म कोणताही असो, माणुसकी आणि एकमेकांच्या श्रद्धांचा सन्मान करणे हाच खरा धर्म आहे. गेल्या ३१ वर्षांपासून मिळणारे हे समाधान शब्दांत व्यक्त करता येणार नाही.”— सुरेश शिवाजी गंभीरे

आजच्या धावपळीच्या आणि राजकीय वातावरणात सुरेश गंभीरे यांनी जपलेली ही परंपरा तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. राजकीय क्षेत्रात सक्रिय असतानाही, आपल्या संस्कृतीतील ‘गंगा-जमुना’ तहजीब जपण्याचे काम त्यांनी अत्यंत निष्ठेने केले आहे. त्यांच्या या कार्याचे अकलूजसह संपूर्ण महाराष्ट्रभरात कौतुक होत असून, मुस्लिम बांधवांकडूनही त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव होत आहे.



