उत्कर्ष शेटे यांना ‘शिव बसव प्रेरणा पुरस्कार’ २०२६ जाहीर,मोहिते-पाटील परिवाराच्या मार्गदर्शनाचा आणि सहकार्याचा गौरव

अकलूज / प्रतिनिधी
दैनिक ‘दिव्य मराठी’च्या वतीने दिल्या जाणारा २०२६ मानाचा ‘शिव बसव प्रेरणा पुरस्कार’ पत्रकार, कलाकार आणि सामाजिक कार्यकर्ते उत्कर्ष शेटे यांना जाहीर झाला आहे. कला, पत्रकारिता, सांस्कृतिक चळवळ, लोकप्रतिनिधित्व, वीरशैव-लिंगायत समाजकार्य, धार्मिक प्रबोधन आणि विविध सेवाभावी उपक्रमांमधील त्यांच्या दीर्घ आणि उल्लेखनीय वाटचालीची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे.

आपल्या या यशामध्ये मोहिते-पाटील परिवाराशी असलेल्या स्नेहाचा आणि योगदानाचा सिंहाचा वाटा असल्याचे शेटे यांनी व्यक्त केले. विशेषतः जयसिंह मोहिते-पाटील (बाळदादा) यांनी वेळोवेळी दाखवलेला विश्वास, दिलेली संधी आणि प्रोत्साहन हा या संपूर्ण प्रवासातील मुख्य आधार राहिला आहे.
चित्रकलेची आवड असणाऱ्या एका तरुणाच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यापासून ते ‘अकलाई माझी सत्वाची’ या प्रकल्पाला दिलेला आशीर्वाद, महात्मा बसवेश्वर स्मारक समितीची स्थापना आणि पुढे सोपवलेल्या विविध जबाबदाऱ्या यांमुळे हे नाते वेगवेगळ्या टप्प्यांवर अधिक दृढ होत गेले, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

उत्कर्ष शेटे यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



