अकलूजमध्ये भाजपच्या वतीने भव्य तिरंगा बाइक रॅली उत्साहात; हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती

अकलूज:प्रतिनिधी
‘हर घर तिरंगा २०२६’ अभियानांतर्गत भारतीय जनता पक्ष माळशिरस तालुक्याच्या वतीने अकलूज शहरात भव्य ‘तिरंगा बाइक रॅली’ अत्यंत उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात पार पडली. या रॅलीत आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी, पश्चिम सोलापूर भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे आणि माळशिरस तालुक्याचे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी,पश्चिम सोलापूर भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे आणि माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या रॅलीत तालुक्यातील हजारो भाजप कार्यकर्ते, नागरिक व युवा वर्ग हातामध्ये राष्ट्रध्वज घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपूर्ण अकलूज शहर ‘भारत माता की जय’ आणि देशभक्तीपर घोषणांनी दुमदुमून गेले होते.

रॅलीचा प्रारंभ अकलूज येथील मध्यवर्ती विजय चौक येथून झाला. त्यानंतर ही यात्रा गांधी चौक, सदाभाऊ चौक, महर्षी चौक, प्रतापसिंह चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, जुने बस स्थानक, जुने पोलीस स्टेशन, शिवापूर पेठ, मारुती मंदिर, नगरपरिषद आणि शिवसृष्टी किल्ला या प्रमुख मार्गांवरून फिरत पुन्हा विजय चौक येथे आली, जिथे रॅलीची उत्साहात सांगता झाली.

याप्रसंगी बोलताना मान्यवरांनी ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत प्रत्येकाने उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपापल्या घरी तिरंगा फडकवावा, असे आवाहन केले. रॅलीच्या संपूर्ण मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी बाइक रॅलीचे स्वागत केले.



