कूकडी आणि लवादा बाबत आमदार संजयमामा शिंदे यांचेकडून शेतकऱ्यांची दिशाभूल – पाटील गटाचा आरोप

करमाळा प्रतिनिधी
कूकडी आणि लवादा बाबत आमदार संजयमामा शिंदे यांचेकडून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा वीट येथील सभेत प्रयत्न झाला असल्याचा दावा पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी केला. वीट ता.करमाळा येथे विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांची सभा संपन्न झाली. या सभेत त्यांनी नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजनेबाबत आपली भुमिका मांडताना कुकडी, लवाद याबद्दल काही वक्तव्ये केली. तसेच २०१४ ते २०१९ या कालावधीत या विषयी काही कामे झाली नसल्याचे सांगितले. यावर आज पाटील गटाकडून आक्षेप घेण्यात आला. पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी आमदार महोदयांचे भाषणातील मुद्दे कसे चुकीचे आहेत हे उघड करताना सांगितले की माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांनी त्यांच्या पाच वर्षाच्या कालावधित कुकडीची एकुण सतरा आवर्तने तालूक्यास मिळवून दिली. कुकडीच्या ३९९९ कोटी रुपये किंमतीच्या सुप्रमा मंजुर करण्यात तत्कालीन आमदार नारायण पाटील व तत्कालीन मंत्री प्रा.राम शिंदे यांचे योगदान आहे. वीट येथील सभेत कुकडीच्या २०१९ नंतरच्या सुप्रमाबाबत आमदार संजयमामा यांनी दिलेली माहिती चुकीची आहे. यावेळी आ.संजयमामा शिंदे यांनी पाणी वाटपा बाबत उजनी अथवा कुकडी मध्ये काही नवीन नियोजित पाणी मागणी आली तर याचा परिणाम कृष्णा खोरे व कृष्णा नदीशी जोडून याचे पडसाद शेजारच्या कर्नाटक राज्यात उमटतात असे सांगितले. हि माहिती साफ चुकीची असुन कृष्णा खोरे आणि भीमा खोरे हि स्वतंत्र दोन खोरी आहेत. लवादाच्या निर्णयानुसार एका खोऱ्यातुन दुसऱ्या खोऱ्यात पाणी नेता येणार नाही असे नमुद आहे. यामुळे उजनी किंवा कुकडीच्या पाणी वाटपात एखादी नवीन उपसा सिंचन योजनेसाठी पाणी मागितले गेले तर त्याचे पडसाद इतर राज्यात उमटणार नाहीत. कारण उजनी व कुकडी हे दोन्ही प्रकल्प भीमा खोऱ्यातच येतात. आणि तसे असते तर इंदापुर तालूक्यातील उपसा सिंचन योजनेस परवानगीच मिळाली नसती. लवादाने कृष्णा-भीमा पाणी वाटपाच्या नियमावलीतील निर्णयाची अंमलबजावणी हि २०१९ पर्यंत लागु राहिल असे सांगितले आहे.परंतू २०१९ नंतर काळानुरुप यात बदल करण्याचे अधिकार राज्य सरकारला असतील असेही सांगितले आहे. यामूळे नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजनेसाठी पाणी राखुन ठेवण्याची मागणी आ.संजयमामा शिंदे यांनी कालवा समिती अथवा राज्यसरकार कडे कितीवेळा केली हे सांगावे. नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजनेचा पाणी वाटपात अगोदर समावेश करणे गरजेचे होते. यासाठी लवादाचा निर्णय २०१९ पुर्वी अडचणीचा ठरत होता अन्यथा तत्कालीन आमदार नारायण (आबा) पाटील यांनी हि योजना केंव्हाच मंजुरी घेऊन मार्गी लावली असती. सन २०१९ नंतर लवादाची अडचण नसताना आ. संजयमामा गप्प का राहिले हे त्यांनी उघडपणे सांगावे. नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन हि माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांची संकल्पना असुन याच्या पुर्ततेसाठी राजकीय जोडे बाजूला सारुन तुमच्या बरोबर एकत्र येऊन हा प्रश्न सोडवण्यासाठी नारायण आबा तयार आहेत. परंतु आपली निष्क्रीयता लपवण्यासाठी चुकीची माहिती अथवा खुप मोठ्या अडचणी आहेत असे भासवून शेतकऱ्यांच्या जीवनमानाशी निगडीत असलेल्या या प्रकल्पाची हेळसांड आ.संजयमामा यांनी करु नये. कुकडीचे पोंधवडी चारीचे काम सुध्दा तत्कालिन आमदार नारायण आबा पाटील यांनी मंजुर करुन आणलेल्या सुप्रमामुळेच चालू आहे. सुप्रमा तयार करणे ही कार्यालयीन बाब आहे आणि ती मंजूर करुन घेणे हे आमदार महोदयांचे काम आहे. यामूळे सुप्रमा तयार करण्याच्या गोष्टीस स्वतःला जोडून दहिगाव उपसा साठी आपण सुप्रमा दोनशे कोटींची मंजुर करुन आणली याचा गवगवा जर आ.संजयमामा करत असतील तर त्याच्या सोळापट रक्कम असलेली कुकडीची सुप्रमा तत्कालिन आमदार नारायण आबा पाटील यांनी मंजुर करुन दाखवली हे लक्षात ठेवावे. यामुळे शेतकऱ्यांची दिशाभुल करताना आपल्या भाषणातुन आ.संजयमामा शिंदे यांनी चुकीची माहिती दिली यावर आपण ठाम असुन त्यांचे हे संपुर्ण भाषण सोशल मेडीयावर उपलब्ध आहे, हवे तर जनतेने हे तपासून पहावे असेही तळेकर यांनी सांगितले



