सामाजिक

काळोखात उजेड पेरणारं – माझं ओम महिला मंडळ.

करमाळा प्रतिनिधी

बाईला खरच आवडतं बोलायला मनातलं भरलेलं आभाळ मोकळं करायला. पण बाईच्या वाट्याला असं व्यासपीठ सहजासहजी मिळत नाही. रडून-लढून तीनं मिळवलय बरंच काही., पण आज जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आम्हा स्त्रियांना मनातील धागे उलगडायची संधी दिली. म्हणून मा.स़ंपादक महोदयांचे व त्यांच्या सहकार्यांचे काळजातून मनस्वी आभार.

मी अंजली राठोड श्रीवास्तव करमाळा. माझ्या महिला मंडळाच्या कार्याची थोडीशी ओळख सांगण्यासाठी आजचा दिवस खूप मोलाचा आहे. मी मुळातच जिद्दी आणि बंडखोर वृत्तीची. बाईचं संकुचित लादलेलं खुरटं काटेरी खुजं जग मला अमान्यच. मी माझ्या हक्कासाठी अधिकारासाठी भांडले. व्यवस्थेविरुद्ध लढले आणि जिंकले ही.बाया हळूहळू मला भिडत गेल्या.अनेक उपोषणे आणि मोर्चे काढून बायांना न्याय मिळवून दिला.देत आहे. बाईच्या जगण्याच्या समाजाच्या तिच्याविषयी अपेक्षा काय आहेत? याहीपेक्षा बाई जगली आणि शिकली पाहिजे माणूस म्हणून ओळखली गेली पाहिजे.म्हणून मी बाईच्या अस्तित्वासाठी समाजकार्या कडे वळाले(१९९४ चा हा प्रवास)हा प्रवास सहज सोपा आणि पेलवणारा तर मुळीच नव्हता. ग्रामीण समाजातील प्रत्येक बाईला बाई माणूस या कोंदणात बसवण्यासाठी मी ओम महिला मंडळ ,लोकमंगल नारी मंच, राष्ट्रीय महिला सुरक्षा संघटन फाउंडेशन, महिला समुपदेशन व तक्रार निवारण केंद्र, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटना, महिला दक्षता समिती, अखिल भारतीय क्षत्रिय राजपूत संघटना महिला प्रकोष्ठ, साहित्य व मार्गदर्शन इ. च्या माध्यमातून मी, माझ्या मंडळाच्या महिला पदाधिकाऱ्यांसोबत महिलांना भेडसावणारे प्रश्‍न सोडवू लागलो.

आणि बाईच्या जगण्याला एक आकार देऊ लागलो. बाई आधी शिकली पाहिजे त्याशिवाय तिला तिचे अधिकार व हक्काची जाणीव होणार नाही. म्हणून आज पर्यंत इयत्ता 10 वी पर्यंतच्या शिक्षणासाठी आम्ही दरवर्षी एक मुलगी संक्रातीनिमित्त दत्तक घेतो तिचा सर्व शालेय खर्च आम्ही मंडळामार्फत चालवतो. खरंच अभिमानानं सांगावसं वाटतं की आज पर्यंत ३६ मुली शिक्षणासाठी दत्तक घेऊन झाल्यात.ग्रामीण भागात याच शिक्षणासाठी मुलींना खूप लढावं लागतं. हे कार्य आज ही सातत्यानं चालू आहे.कळी उमलताना, तारुण्याच्या उंबरठ्यावर इयत्ता नववीच्या मुलींसाठी हा कार्यक्रम राबवतांना त्यात अभिनय सादरीकरण या अंतर्गत मुली खोल मनात दडलेलं मौन सोडतात.मन सैल करतात. दाटलेला पीळ उलगडतात. घरातील काही पुरुष नात्यांपासून कसा धोका असतो याचं चित्रण त्या करतात.मनात दडलेला तळ मांडतात. आज घरातही महिला सुरक्षित नसाव्यात? याचं वाईट वाटतं!स्वातंत्र्य मिळून किती वर्षे लोटली तरीही बाई समोर सुरक्षा संदर्भात अजूनही प्रश्न उभे रहावेत? अजून किती लढावं लागणार आहे या व्यवस्थेविरुद्ध? निर्भया पेटी प्रत्येक शाळेत ठेवून त्यात मुली चिठ्ठी टाकून आपल्या समस्या मांडतात. त्या ही समस्या आम्ही बाया समुपदेशनानं सोडवतो.परकी बाई हक्काची आहे. हे मुलांच्या मनावरील बिंबलेलं खोडून काढताना दमछाक होते खरी. आम्ही प्रयत्न करतो.मनातलं थेट बोलण्याचं एक हक्काचं व्यासपीठ म्हणजे माझं महिला मंडळ. कधी दिवसा तर कधी रात्री अपरात्री बाया येतात. समस्या मांडण्यासाठी. केविलवाणा बाप आर्जव करतो. “पोरीच्या पाठीवरचे वळ दाखवतो.तेव्हा संताप होतो जिवाचा. काळजाची घालमेल होते,पण हे नाजूक नात्याचे प्रश्न संयमानं सोडवावे लागतात.पुरुषांना समुपदेशन करून आज कित्येक संसार वाचवण्यात मला व माझ्या मंडळाला यश आले आहे. या कामी कधी -कधी पोलीस स्टेशनचे पण आम्हाला खूप सहकार्य लाभते.बाईला नसतं एखादं हक्काचं घर! माहेर सुटलं की ती सासरी येते.”चालती हो माझ्या घरातून असा पुरुषी दम बायांना नवा नाही!” मग जातील कुठं या बायका? हृदयाला भेडसावणाऱ्या कित्येक प्रश्नांना काळजात सोबत घेऊन बाया जगत असतात.खरच बाईच्या अशा जगण्याला जगणं म्हणायचं का? समाजातील अर्ध्या स्त्रिया हक्क अधिकार व आर्थिक स्वावलंबनाचे सोनेरी पंख घेऊन उडत आहेत. पण ग्रामीण भागातील अर्ध्या स्त्रियांच्या वाट्याला अजूनही गुलामी आणि दास्यत्व आहे.आर्थिक बाजूने त्या भक्कम राहण्यासाठी व बाईला एक सामाजिक, कौटुंबिक दर्जा असावा म्हणून बचत गटाच्या माध्यमातून कितीतरी महिलांना आज आम्ही उद्योग उभारण्यासाठी कर्ज दिले आहे. आटा चक्की ,दुग्ध व्यवसाय ,शेती शेळीपालन ,ब्युटी पार्लर, भाजीपाला विक्री ,धान्य विक्री अशा कितीतरी व्यवसाय आज बाया जोमाने करत आहेत.बाया बँकेत जातात गटाच्या सभेला येतात.ही सुवर्णयुगाची नवी पहाट का ठरू नये ?आमच्या बचत गटाचा पहिला नियम आहे- कर्ज काढून सणवार करायचा नाही. कर्ज काढून जावयाला अंगठी द्यायची नाही.व्यवसायातून मिळालेल्या नफ्यातून लेक व जावयाचे कौतुक नक्की करा. बाया व्यवसायासाठी कर्ज काढतात न घाबरता व्यवस्थित हप्ते फेडतात. बाईला व्यवस्थापन नवं नाही. ते तिच्या रक्तातच असतं. फक्त तिला संधी मात्र मिळत नाही फारशी. विधवा महिलांसाठी सहेली सॅनिटरी नॅपकिन विक्री उद्योग सुरू केला आहे चार पैसे त्यांनाही मिळत आहेत विधवांचे प्रश्न तर खरंच फार गंभीर आहेत. बाया आर्थिक पाठबळानं खरंच भक्कम असायला हव्यात. आपण आपल्या पायावर उभं राहायला हवं म्हणून शिक्षणाची खरी गरज आहे हे आता कुठं पटू लागलय. महिलांच्या सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन महिलांना मुक्त व्यासपीठ लोकमंगलच्या माध्यमातून उभा केलं आहे‌ नाटक ,नृत्य, गायन ,नकला असे अभिनय करून महिला समाज प्रबोधन करतात. अभिनयातून शेतकरी आत्महत्या ,स्त्री भ्रूण हत्या, जिजाऊ ,रमाई व सावित्रीबाईंचा जीवनपट त्या मांडतात. विनोदातून जगण्याचे रहस्य उलगडतात. त्या 2 दिवसात बाई खरी जगते असे वाटते.या कामी लोकमंगल चे सहकार्य लाभते. आजही स्त्री आरोग्याचे प्रश्न कुठे सुटलेत? तिला आजारी पडताच येत नाही जबाबदारीतून मुक्त झाल्याशिवाय. म्हणून तिचा हिमोग्लोबिन चा जागतिक आरोग्य संघटनेचा हा प्रश्न आम्ही चुटकीसरशी सोडवतो आहे. गर्भाशय मुखाचा कैंसर तपासणी शिबिर मोफत घेऊन अनेक महिलामध्ये जनजागृती घडवून आणली आहे.अनेक आरोग्य शिबिरे घेऊन मार्गदर्शनातून किंवा व्याख्यानातून बायांना आरोग्याचं महत्त्व पटवून दिले आहे . बाईच्या अवती -भोवती फिरणारे प्रश्न व त्यांची सोडवणूक बाईला केंद्रस्थानी ठेवून तिचा सर्वांगीण विकास हा माझ्या मंडळाच्या समाजकार्याचा धागा आहे. क्षेत्र कुठलेही असो पण बाईला स्पर्धेत उतरण्यासाठी लढावं लागतं हे नाकारता येत नाही.साहित्य क्षेत्रातही आज कित्येक जणी लिहित्या झाल्या. लिहित्या होत आहेत. मनातला तळ त्या मांडायला लागल्या आहेत. त्या व्यक्त होत आहेत. हीच खूप मोठी जमेची बाजू आहे. कविता जगतांना आणि लिहिणा-या आम्ही या दोन्ही साहित्य मंचच्या माध्यमातून “कविता जगतांना” हा करमाळ्यातील पहिलाच प्रातिनिधिक काव्यसंग्रह आहे जो महिला ने संपादित केला आहे.महिला मिळून काय करू शकतात? हे उदाहरण आता समाजासमोर आले आहे. ग्रामीण भागातल्या महिलांच्या अंगणातही आता सूर्याचा कवडसा पडू लागलाय हे गर्वानं सांगावसं वाटतंय. बायांचे प्रश्न साहित्यात उतरवणं मला आवडतं.ही तर कथा माझीच वाटते असं जेव्हा त्या व्यक्त होतात तेव्हा खरंच मनाला आनंद होतो.माझी कथा कुणा बाईच्या आयुष्यातली खरी कहाणी ठरते या आनंदाची शब्दात मोजदाद नाही करता येत कधीच. भर पावसात भिजत आलेल्या तारा ची कहाणी खूप वेगळी.(तारा हे नाव इथं काल्पनिक आहे) गरम चहाचे घोट पीत डोळ्यातील थंड अश्रू थोपवत ती सांगू लागली तिची कहाणी. नाव तारा. पण अंधारच वाट्याला. भाकरीच्या एका तुकड्यासाठी देह विक्री करावी लागते. थक्क व्हायला होतं असं काही ऐकलं की!सुचतच नाही काही.तरीही तिला सांगितलं तारा रात्रीच खुलून दिसतो. तू ही रात्री पुस्तक वाच अभ्यास कर. आणि नकार द्यायला शिक तू.तुझा नकार त्या वेळीं महत्वाचा आहे. आज ती शिकते आहे. कसल्या आणि किती भयाण समस्यांशी जीवन गुंतलं आहे बाईचं. सावकारी कचाट्यातून सुध्या अनेक संसार आम्ही वाचवले आहेत. बाईच्या गळ्या भोवती पडलेला पीळ,गुंता सुटेल ना हा?सुटायला हवा!गुंताकिती करुन ठेवलाय गुंताआयुष्याचा!खरंतर आयुष्य जगणं सोपं आहेपण…आयुष्य बाईपणांत जगणंखरंच कठीण.गुंता!!तो सुटत नाही कधीचसुटलाच कधी कसा तरी..तर..गाठ बसलेली असते कायमची..चिवट!ती गाठ सोडवायची असते बाईला.. आयुष्यभरनखाणं..दातांनंतर कधी मनानं.अगदी जीव तोडूनत्यातच गुंतून जाते तीकायमची..एक गाठ बनून!! समाज कार्याच्या माध्यमातून बाईचं जगणं खरंच थोडं सुकर केलं मी आणि माझ्या मंडळातील महिलांनी. माझ्या मैत्रिणी सोबत आहेत म्हणून पीडित बाईच्या जखमांवर फुंकर मारू शकले. हे काम एकटीचं कुठलं? सगळ्याजणी सोबत आहेत म्हणून लढा सोपा होतो आहे. साहित्यिक मैत्रिणी, समाजकार्यातील मैत्रिणी, पीडित मैत्रिणी,बचत गटातील मैत्रिणी,भिशी गृपमधील अशा किती तरी मैत्रिणी मला जोडल्या गेल्या. अनेक बलवान प्रचंड अशी एक साखळी तयार होत गेली ही साखळी साधी नाही हे मात्र आज ही मी ठामपणे सांगू शकते.छोट्या छोट्या प्रश्नांनी, समस्यांनी वेढलेल्या ,गुंतलेल्या बाईला फक्त माझा नंबर द्या मी आणि माझं मंडळ नक्कीच तयार असेल तिची सोडवणूक करायला.खरं तर बायांना आपल्यावर अन्याय होतो आहे हेच कळायला फार उशीर होतो. स्त्रीमुक्तीचे वारे,महिला सबलीकरण या गोष्टी आता कागदावर किंवा शहरापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. तर त्या आम्ही ग्रामीण महिलांनी खेचून आणल्यात स्वबळावर. आणि पीडित महिलेला न्याय देण्यासाठी झगडत आहोत अविरत. इतिहासाचा संदर्भ घेत मागे जाऊन स्त्रियांपुढील प्रश्न आम्ही आज सोडवत आहोत ही प्रकाशमान आणि दैदीप्यमान ..अशी वाटचाल ही घोडदौड अशीच निरंतर चालू राहणार आहे. हा अंतर्मनातला हुंकार स्वस्थ बसू देत नाही. खरंच! या लेखाच्या समारोपात एक सांगावसं वाटतं की समाजातील (कांही)पुरुष वर्ग वाईट नाही पुरुष समजायला सोपा असतो बाई च्या तुलनेत, पण निम्मा समाज बाई आणि निम्मा समाज पुरुषाने बनलेला आहे.तरीसुद्धा बाईची मानसिकता समजून घ्यायला पुरुष कुठेतरी कमी पडतो ही शोकांतिका आज आपल्यासमोर आहे.म्हणूनच आज दोघांनी मिळून स्त्री प्रश्न सोडवणे हितावह ठरेल.एवढेच काळजातून वाटते. (माझ्या पीडित महिलेच्या नोंदी, त्यांचे सोडवलेले प्रश्न, गटाच्या माध्यमातून उद्योग उभारणीतपुढं आलेल्या स्त्रिया.शिक्षणासाठी दत्तक घेतलेल्या मुली यांच्या नोंदी,बातम्या माझ्याकडे लिखित स्वरूपात जतन करून ठेवल्या आहेत.)

अंधार सारुन आता उजाडलय..लख्खं..!!बाईचं जगणं ही!ती बोलते आतामौन सोडूनमनातलं…इतक्या दिवसदबलेलं..दाबलेलं..मनावरचं ओझंआता कुठं हळूहळू उतरू लागलय!!

मला माझ्या महिला साहित्यकगृप आणि महिलामंडळाची ओळख व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल मनापासून पुन्हा -पुन्हा आभार.पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या आभाळभर हार्दिक शुभेच्छा.अंजली राठोड श्रीवास्तव.करमाळा.७७०९४६४६५३.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button