10 एप्रिल होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हानिमन यांच्या जयंतीनिमित्त.होमिओपॅथी : एक वरदान…
टाइम्स 9 मराठी न्यूज
सतत होणाऱ्या शारीरिक व्याधीमुळे त्रासून गेला असाल , तर अशा रुग्णांना होमिओपॅथिक औषध योजना ही खरोखरच वरदान आहे. शारीरिक तक्रारी अनेकविध ; परंतु औषध मात्र एकच. रोगनिवारण होत असताना शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवणे, रोगामुळे निर्माण झालेले मनोदौबल्य नाहीसे करणे हे होमिओपॅथिक औषधाचे वैशिष्ट्ये म्हणता येईल..
होमिओपॅथी ही उपचार पद्धती म्हणजे जर्मन डॉ.सॅम्युएल हानिमन यांनी जगाला दिलेले एक वरदान आहे. त्यांचा जन्म 10 एप्रिल 1755 रोजी जर्मनी येथे झाला. त्यांनी वयाच्या 35 व्या वर्षी होमिओपॅथीचा शोध लावला. या उपचार पद्धतीमध्ये निरोगी व्यक्तीमध्ये रोगसदृश्य स्थिती निर्माण करणारी औषधी पदार्थ रोगी व्यक्तीमध्ये आजार बरा करण्यासाठी वापरता येतात. निरोगी व्यक्तीमध्ये निर्माण झालेली आजाराची लक्षणे त्याच्या तीव्रतेनुसार नोंद करून ठेवली जातात. या लक्षणांशी सामर्थ्य दाखवणारी लक्षणे जेव्हा रोगी व्यक्तीत निर्माण होतात , तेव्हा त्या विशिष्ट औषधाचा वापर करून आजार बरा केला जातो. “व्यक्ती तितक्या प्रकृती” या तत्त्वावर होमिओपॅथीचा उपचार अवलंबून असतो.
त्यामुळे प्रत्येक रुग्णाची शारीरिक आणि मानसिक जडणघडण समजावून घेऊन मगच योग्य औषध निवडता येते. प्रत्येक व्यक्ती ही भावनिक जडणघडण, वर्तणूक,आकांशा,खाण्यापिण्याच्या व इतर आवडीनिवडी,छंद आणि बौद्धिकता अशा अनेक पैलूंमुळे दुसऱ्या व्यक्ती पेक्षा वेगळी असते. प्रत्येकाची प्रकृती व आजार हे पण वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होत असतात. जसे एखाद्याची अंगदुखी हालचाल केल्याने कमी होते, तर कोणाची विश्रांतीने.एखादा ताप आलेला रूग्ण जाड पांघरून घेईल,तर दुसरा तापातही पंखा लावायला सांगेल. एखाद्याला सांध्यामध्ये टोचल्यासारखी वेदना होतील. कुणाला ठणकल्यासारख्या,तर कुणाला ओढल्यासारख्या थोडक्यात,आजार एकच असला तरी त्याची लक्षणे, स्वरूप लक्षणांची तीव्रता,त्रास कमी- जास्त करणारे घटक प्रत्येक माणसात वेगवेगळे असतात. मग एकच औषध सगळ्यांना कसे लागू पडेल ? म्हणून होमिओपॅथिक औषधांची निवड केवळ रोगावरून होत नसून, प्रत्येक व्यक्तीचा नैसर्गिक वेगळेपणा विचारात घेऊन असते.
होमिओपॅथिच्या तत्वानुसार आजाराची संकल्पना म्हणजे सर्व प्राणिमात्रामध्ये एक विशिष्ट उर्जा सतत कार्यरत असते.या ऊर्जेला चैतन्यशक्ती (व्हायटल फोर्स) म्हटले जाते.ही चैतन्य शक्ती शरीरातील विविध संस्थांमध्ये समन्वयाने काम करीत असते.चैतन्य शक्तीचे शरीरातील विविध पेशींमधील सुसंवाद,पेशीचे नवनिर्माण व नाश , संप्रेरकाची रक्तातील योग्य पातळी यावर नियंत्रण असते.या चैतन्य शक्तीचे संतुलन कोणत्याही बाह्य अथवा अंतर्गत कारणाने बिघडल्यास शरीरातील समन्वयाची स्थिती बिघडते आणि रोग निर्माण होण्यास अनुकूल स्थिती निर्माण होते.काही आजार तात्पुरत्या स्वरूपाचे (उदा.ताप, सर्दी, खोकला), तर काही गंभीर स्वरूपाचे (दमा, संधिवात, रक्तदाब, कर्करोग) असतात.
आजारामुळे निर्माण झालेली लक्षणे अथवा लक्षण समूह यांचा अभ्यास करून त्यानुसार औषधाचे व औषधाच्या शक्तीची निवड करण्यात येते. हे औषध दिल्यावर शरीरात कार्यरत असलेल्या विविध पेशी उद्दीपित होतात आणि रोगाचा प्रतिकार करून त्याचा नाश करण्यास सक्षम बनतात.अनेक असाध्य व कष्ट साध्य रोगावर होमिओपॅथिक औषधे प्रभावीपणे कार्य करतात. एवढेच नव्हे, तर अतिशय जलद गतीने रोग निवारण करतात .
तात्पुरत्या आजारामध्ये त्वरित गुण येण्यासाठी औषधांची आणि औषधांच्या शक्तीची अचूक निवड करावी लागते. डॉक्टरांचा अनुभव अथवा ज्ञान कमी असल्यास बऱ्याचदा गुण येण्यास वेळ लागतो.स्वतः रुग्णाने सुद्धा आपल्या आजाराची बारीक-सारीक माहिती लक्षात ठेवून डॉक्टरांना सांगणे आवश्यक असते. त्यामुळे डॉक्टरांना योग्य औषध निवडण्यास मदत होते. जुनाट व्याधीत सुद्धा याच गोष्टींची आवश्यकता असते.
आजाराची लक्षणे, विशेषतः त्वचारोगात जर बाह्य उपचारामुळे सुप्ताअवस्थेत असतील, तर होमिओपॅथिक औषधाने ती आधी उफाळून येतात व नंतर हळूहळू आजार कमी होत जातो. आजाराची तीव्रता,व्याप्ती आणि कालावधी यावर गुण येण्याची वेळ ठरते.आजाराची निर्मिती अनुवंशिकता, प्रतिकारशक्तीचा ऱ्हास किंवा पर्यावरण या तिन्ही बाबीवर अवलंबून असते. प्रत्येक आजारात जादूसारखा गुण येणे शक्य नसते.औषध वेळेवर घेणे, पथ्य पाळणे आणि थोडा दम धरणे या बाबी आवश्यक असतात.
औषधांची अयोग्य निवड आणि अयोग्य शक्तीची औषधे घेतल्यास शरीरात बिघाड निर्माण होऊ शकतो. होमिओपॅथिक औषधे होमिओपॅथिक तज्ञांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत.होमिओपॅथिक औषधे ही घेण्यास अत्यंत सोपी असतात. ही औषधे गोड असतात.लहान मुलापासून म्हाताऱ्यापर्यंत सर्व वयोगटांमध्ये होमिओपॅथिक औषधाने इलाज करता येऊ शकतो. रोग प्रतिकाशक्ती वाढते.महत्त्वाचे म्हणजे होमिओपॅथिक तज्ञ अनुभवी असणे आवश्यक असते..
……………………………………………..
डॉ.बाळकृष्ण एन.गायकवाड
एमडी होमिओपॅथी (पुणे)
मा. उपाध्यक्ष महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी, मुंबई
प्रशासकीय सदस्य महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी मुंबई
पत्ता. द्वारका होमिओपॅथिक हॉस्पिटल
मोतीराम कॉम्प्लेक्स,पौड रोड ,
मेट्रो स्टेशन समोर ,कोथरूड पुणे 38
संपर्क 99 21 93 91 91
मेल.. gaikwadbn78@gmail.com