महाराष्ट्र

आणि अखेर शरद पवारही बरळले. म्हणून म्हणालो होतो की चळवळी जीवंत राहिल्या पाहिजेत, वाढल्या पाहिजेत-ॲड.शीतल चव्हाण

उपसंपादक——हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो. 9730 867 448

उजव्या-भांडवली शक्तीचे हितसंबंध सांभाळणारे राजकारण काय फक्त भाजपाच करते? या विखाराची पाळंमूळं सर्वच राजकीय पक्षात कमी-अधिक प्रमाणात पसरलेली आहेत. ‘अदाणींच्या शेल कंपन्यांत २० हजार कोटी कुठून आले?, अदानी-मोदी यांचे नाते काय?’ हा भांडवलदार धार्जिन्या राजकारणाला धक्का देणारा प्रश्न राहुल गांधी यांनी केला. या प्रश्नांवरुन घेतलेल्या पत्रकार परिषदेत “तुम्ही ‘मोदी बदनामी प्रकरणात’ माफी का मागितली नाही?” या पत्रकारांनी केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राहुल म्हणाले “माफी मागायला मी सावरकर नाही, गांधी आहे”. हा उजव्या छावणीच्या सांस्कृतिक दहशतवादाला जबर धक्का होता.

एकाचवेळी देशातल्या बड्या भांडवलदारांना आणि उजव्या सांस्कृतिक दहशतवादी छावणीला राहुलनी अंगावर घेतले. मग या उजव्या-भांडवली शक्तींच्या मदतीने आजवर पोसलेले गप्प कसे बसतील?
कॉंग्रेसमधल्या या उजव्या-भांडवली छावणीच्या पिलावळींनी राहुल यांची पोटतिडकीने बाजू न मांडता त्यांना एकटे पाडले. एकेकाळच्या उजव्या राजकारणाचे मुकुटमणी असलेल्या बाळासाहेबांचे पुत्र उद्धवजींनी ‘सावरकरांचा अपमान खपवून घेणार नाही’ अशी तंबी दिली.

अदानींचे चांगले मित्र व नरेंद्र मोदी यांचे गुरु शरद पवार यांनी यात उडी घेत सावरकरांची व अदानींची बाजू मांडणारी वक्तव्ये करुन उजव्या-भांडवली छावणीच्या आजवरच्या उपकारांची अल्पशी परतफेड केली.
उजव्या-भांडवली छावणीला अंगावर घेवून या देशात सत्तेत येणे तर सोडा पण विरोधी बाकावरही बसणे अशक्य असते, हे या प्रकरणाने सिद्ध केले आहे. सत्तेतले आणि विरोधकही या उजव्या-भांडवली छावणीला पुरकच असावे लागतात. त्याशिवाय सत्ताधारी म्हणून किंवा विरोधक म्हणूनही राजकारणाचे उंबरठे ओलांडताच येणार नाहीत, अशी व्यवस्था केली गेलेली आहे.

छ. संभाजीनगर येथे झालेल्या सभेत हिंदू-वैदिक संस्कृतीचे प्रतिक असलेल्या भारतमातेच्या प्रतिमेला ‘महाविकास आघाडीचे दैवत’ म्हणून संबोधण्यात आले. त्याबद्दल लिहिलेल्या लेखात चळवळीतल्या लोकांनी भाजपाचा विरोध करताना व ‘मविआ’चे समर्थन करताना ‘मविआ’त विरघळून न जाता आपले अस्तित्व टिकवत आपला विस्तार करण्याची आवश्यकता मांडली होती. शरद पवारांच्या वक्तव्यानंतर ही आवश्यकता अधिकच अधोरेखित झाली आहे.

या देशात खऱ्या अर्थाने संविधानाची मूलतत्वे रुजवायची असतील तर डाव्या-पुरोगामी चळवळी बळकट झाल्या पाहिजेत. कुठल्याही प्रस्थापित राजकीय पक्षांच्या सोयीनुसार बदललेल्या भूमिकांना न फसता आपले अस्तित्व चळवळींनी टिकवून ठेवले पाहिजे. संघर्षाशिवाय, प्रस्थापितांच्या सोयीच्या राजकारणाला भाबडेपणाने बळी पडून आपली वाटचाल पुढे सरकणार नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. आपल्याला संघर्षाशिवाय पर्याय नाही, हे ध्यानी घेतले पाहिजे.

© ॲड. शीतल शामराव चव्हाण
(मो.9921657346)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button