इंदापूर तालुक्यात काही लोक व पक्ष जाती धर्मात तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजण्याच्या तयारीत, वेळीच डाव ओळखून सावध होण्याचे माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन.
बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी, मोबाईल – 8378076123
इंदापूर तालुक्यात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही विशिष्ट लोक व पक्ष जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्नात असल्याने आपण सावध राहावे असे आवाहन माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
बावडा ( ता. इंदापूर ) येथील जामा मस्जिद येथे रमजानच्या पवित्र महिन्यातील उपवासानिमीत्त माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. सध्याला मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिन्याचे रोजे ( उपवास ) चालू आहेत. यानिमित्ताने दत्तात्रय भरणे यांनी आवर्जून उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रतापराव पाटील, माजी सभापती प्रशांत पाटील, श्रीमंत ढोले सर, उमेश घोगरे, हनुमंत कोकाटे, सुरेश शिंदे सर, विजय घोगरे, संग्रामसिंह पाटील, अभिजीत घोगरे, तुकाराम घोगरे, दत्तामामा घोगरे, नागेश गायकवाड, जालिंदर गायकवाड, राहुल बागल, विजय गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांना शुभेच्छा देताना आमदार भरणे म्हणाले की, मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्रित येऊन एकमेकांच्या सणा- वारामध्ये सहभागी होऊन शुभेच्छा देत असतो. आप- आपसातील भाईचारा, बंधुभाव असाच टिकला पाहिजे ही ख-या अर्थाने आपल्याला प्रेषीत मोहंमद साहेबांची शिकवण असल्याचे सांगत त्यांनी मुस्लीम बांधवांना रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या. बावडा गावातील समाज बांधवांनी इफ्तार पार्टीचे केलेले आयोजन अतिशय स्तुत्य असून यामध्ये आपण सर्वजण सहभागी झाल्याने मनापासूनचा आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले.
सध्याला अवतीभोवती जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण करू पाहणारी प्रवृत्ती फोफावत चालली आहे. परंतु आपण गुण्यागोविंदाने एकत्रित राहणारे लोक आहोत, एकमेकांच्या सुखा- दुःखात सहभागी होत असतो. त्यामुळे आपल्यातील बंधुभाव व एकोपा असाच टिकून राहिल हा विश्वास व्यक्त केला. मुस्लिम समाजाच्या विकासासाठी आपण नेहमीच आग्रही राहिलो व भविष्यातही जिथे कुठे तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून माझी मदत लागेल तिथे सर्वोतोपरी मदत करण्याचा शब्दही यावेळी भरणे यांनी उपस्थित मुस्लिम बांधवांना दिला.
सदर प्रसंगी माजी सभापती प्रशांत पाटील, श्रीमंत ढोले यांची भाषणे झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाहरूख जामदार, जाकीर शेख, युसूफ शेख, अस्लम मुलाणी, युन्नुस मुलाणी, अफसर मुलाणी, सलीम मुलाणी आदी समाज बांधवांनी परिश्रम घेतले. रोजा (उपवास) सुटण्याच्या वेळी रोजदारांना खजूर, शरबत, कलींगडचे वाटप करण्यात आले. त्यानंतर दालचा राईसचा प्रसादाचे वाटप करण्यात आले.