सन २०२४ मध्ये आ. संजयमामा शिंदे यांचा पराभव अटळ असून आ. बबनदादा हे आपला पाठिंबा काढून घेणार प्रवक्ते सुनील तळेकर यांचा खळबळ जनक दावा

करमाळा प्रतिनिधी
सन २०२४ मध्ये आ.संजयमामा शिंदे यांचा पराभव अटळ असून आ. बबनदादांचा पाठिंबा मिळणार नसल्याचा खळबळजनक दावा पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केला. याबाबत अधिक सविस्तर बोलताना तळेकर यांनी सांगितले की सन २०२६ मध्ये विधानसभा मतदार संघाची पुनर्रचना होणार असून करमाळा मतदार संघाला जोडलेली माढा तालुक्यातील गावे ही परत एकदा माढा विधानसभा मतदार संघात समाविष्ट करण्यात येणार आहेत. यामुळे विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांना २०२९ मध्ये मतदार संघ उरणार नाही.
यामुळे जर सन २०२४ मध्ये संजयमामा शिंदे यांना आमदार केले तर सन २०२९ मध्ये ते आ. बबनदादा यांचे माढा मतदार संघात प्रतिस्पर्धी होऊ शकतात. आमदार संजयमामा शिंदे यांच्या विरुध्द लढण्यापेक्षा माजी आमदार संजयमामा शिंदे यांचेशी लढणे अधिक सोपे जाणार या उद्देशाने आगामी २०२४ चा विधानसभा निवडणुकीत आमदार बबनदादा हे कदापीही संजयमामा शिंदे यांना आमदार करणार नाहीत. ते आपली ताकद आपलाच २०२९ मधील विरोधक बळकट करण्यासाठी वापरणार नाहीत असा भक्कम दावा प्रवक्ते तळेकर यांनी केला तसेच करमाळा मतदार संघास जोडलेल्या ३६ गावात आजही आ. बबनदादा हे स्वतः जातीने लक्ष देत असून आमदार आपल्या दारी या आ. संजयमामा यांच्या उपक्रमावेळी आ. बबनदादा हे या ३६ गावात पुढाकार घेऊन हजर राहिले. आ.संजयमामा शिंदे यांना एकट्याला या ३६ गावात आपली राजकीय मूठ भक्कम करण्यासाठी संधी दिली नाही. माढा तालुक्यातील या ३६ गावासह अनेक ठिकाणी ग्रामपंचायत स्तरावर मामा विरुद्ध दादा असेच पॅनल लढत असतात.यामुळे या भागात सर्व काही आलबेल आहे असे नाही. सन २०२४ मध्ये आमदार संजय मामा शिंदे यांचा पराभव अटळ असल्याचा पुनरुच्चार प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केला.