उजनी मायनस मध्ये गेली असून आमदार संजयमामा यांनी बोटीमध्ये बसून फिरण्या एवढं पाणी अजून बाकी : प्रवक्ते सुनिल तळेकर

करमाळा प्रतिनिधी
उजनी मायनस मध्ये गेली असून आमदार संजयमामा यांनी बोटीमध्ये बसून फिरण्या एवढं पाणी अजून बाकी आहे असा मार्मिक टोला पाटील गटाकडून मारण्यात आला. उजनी धरणाचे पाणी पातळी गेल्या दहा वर्षात प्रथमच इतक्या लवकर मायनस मध्ये गेल्याने धरणग्रस्त सुद्धा काळजीत पडले आहेत. यावरून माजी आमदार नारायण पाटील पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी थेट विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांचेवर हल्लाबोल केला. यावेळी तळेकर म्हणाले की या पाच वर्षाच्या कालावधीत कालवा नियोजन बैठकीत विद्यमान आमदार महोदयांनी एकदाही धरणग्रस्त अथवा करमाळा तालुक्याची बाजू लावून धरली नाही. उजनीचे पाणी वाटप नियोजन होत असताना धरणग्रस्त शेतकऱ्यासाठी राखून ठेवलेल्या पाच टी एम सी पाण्याविषयी हक्क प्रस्थापित केला नाही. या उलट इंदापूर तालुक्यातील नियोजित उपसा सिंचन योजनेस मुक संमती दर्शवली. आमदार संजय मामा यांच्या डोळ्यादेखत उजनीचे दरवाजे अनेकवेळा उघडून नदीत पाणी सोडले गेले पण एकदाही त्यांनी विरोध दाखवला नाही. या उलट माजी आमदार नारायण पाटील यांनी नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उजनीच्या पाण्याचा विषय मांडला आणि धरणग्रस्त शेतकऱ्यांना शेती पंपासाठी जून 2024 अखेर पर्यन्त अखंडीत वीज पुरवठा दिला जावा तसेच उजनीचे पाणी पिण्यासाठी राखून ठेवायचे या नावाखाली उजनी बॅक वॉटर परिसरातील शेती पंपाची वीज कनेक्शन तोडली जाऊ नयेत अशी मागणी पालकमंत्री

चंद्रकांत पाटील यांच्या कडे केली आहे. विद्यमान आमदार महोदयांनी मात्र एकदाही उजनी बाबत भाष्य केले नाही. पर्यटन विकासाच्या नावाखाली जिल्हाधिकारी यांच्या समवेत बोटीत बसून उजनी धरणातील पाण्यात जलविहाराचा आनंद घेणाऱ्या आमदार महोदयांनी आता उजनी मायनस मध्ये गेली असता एकदा बोटीतून उजनी बॅक वॉटर परिसरातील पाण्याची पाहणी करावी अशी मार्मिक टिप्पणी प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केली.



