लहान मुलाच्या हातात स्मार्टफोन दिल्यास बाळाची गति मंद होऊ शकते?… बालरोगतज्ज्ञांचं मत
(ठाणे प्रतिनिधी) राजेंद्र भगवान भोईर
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
सध्याच्या काळात स्मार्टफोन (Smartphone), लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसून येतो. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेकांच्या हातात स्मार्टफोन असतो.त्यातच घरी लहान मुले रडत असताना किंवा आई-वडिलांना काम करत असताना त्रास देत असतील तर लहान मुलांच्या हातात स्मार्टफोन देऊन त्यांना शांत केले जाते. पण हेच स्मार्टफोन आरोग्यासाठी घाकत असते आणि त्याचा आरोग्यावर हानिकारक परिणाम होऊ शकतो.
त्यामुळे हे तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठीही घातक ठरू शकते. या संदर्भात बालरोगतज्ज्ञांचं मत नेमकं काय आहे जाणून घेऊयात,बालरोगतज्ज्ञांच्या मते, अनेकदा आपल्या बाळाला जेवण भरवताना ते खात नसेल तर अशा परिस्थितीत आई त्याच्या हातात स्मार्टफोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स देतात. पण हे चुकीचे आहे.
कारण, या स्मार्टफोनमधून निघणारे रेडिएशन हे तुमच्या बाळासाठी घातक ठरु शकतात. स्मार्टफोनमधून निघणारे रेडिएशन हे तुमच्या बाळाच्या शरीरातील सर्व अवयव आणि त्वचेवर परिणाम करु शकतात. लहान बाळाचे सर्व अवयव आणि त्वचा नाजूक असल्याने त्यांना अधिक धोका असतो.लहान बाळ हे प्रौढांच्या तुलनेत दोन ते तीन पट अधिक रेडिएशन शोषतात. बाळ जन्मल्यावर त्यांच्या मेंदूचा विकास होण्यासाठी दोन वर्षांपर्यंतचा काळ लागतो. या काळात मज्जासंस्था, मेंदू आणि डोळे विकसित होतात.
लहान बाळ हे मोबाईल रेडिएशनच्या संपर्कात आल्याने त्याचे भयंकर दुष्परिणाम होऊ शकतात. तात्काळ याचे परिणाम दिसले नाही तरी भविष्यात त्याचे अत्यंत घातक दुष्परिणाम दिसून येऊ शकतात. अनेक अभ्यासात असे समोर आले आहे की, मोबाईलमधून निघणारे रेडिएशनमुळे मुलांच्या वर्तनाच्या संबंधित समस्या, अस्वस्थता यांच्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
गर्भवती महिलांनी सुद्धा मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सचा वापर कमी करावा. कारण, यामधून निघणाऱ्या रेडिएशनचा गर्भातील बाळावर परिणाम होऊ शकतो. सेंटर फॉर डिसिज अँण्ड प्रिव्हेंशनच्या मते, रेडिएशनच्या संपर्कात आल्याने गर्भवती महिला आणि बाळाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. इतकेच नाही तर बाळाच्या मेंदूवर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता आहे.