पालघर मध्ये बोगस नोटांप्रकरणी मुंबई भायखळा पोलिसांनी केली चार जणांना अटक

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक: 7030516640
बनावट नोटा मुंबईच्या चलनात आणणाऱ्या चार जणांच्या टोळीला रविवारी मुंबई भायखळा पोलिसांनी अटक केली आहे.पालघर येथील एका शेतात बोगस नोटांचा कारखाना या टोळीने सुरू केल्याचे उघडकीस आले आहे. पालघरच्या निहालपाड्यात या टोळीने पत्र्याचे शेड टाकून बोगस नोटांचा कारखाना सुरू केला होता. गेल्या सात महिन्यांपासून ते बोगस नोटांची छपाई करत होते. या बोगस नोटांच्या कटातील खलील नावाचा हा मुख्य आरोपी असून फरार आहे.
विशेष म्हणजे बोगस नोटांच्याच गुन्ह्यांत त्याला यापूर्वी पोलिसांनी अटक केली होती. मात्र जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा बोगस नोटांची छपाई सुरू केली होती. त्याच्या शेतातील कारखान्यात पोलिसांनी छापा टाकून दोन लॅपटॉप, चार्जर, माऊस, १३६७ नग बटर पेर, नोटांच्या मध्ये इंग्रजीत लिहिलेली तार, दोन

स्क्रिन प्रिंटिंग डाय, स्क्रिन प्रिंटिंग रोलर, लॅमिनेशन फिल्म्स आदी मुद्देमाल जप्त केला आहे. उमरान ऊर्फ आसिफ उमर बलबले, यासिन युनूस शेख, भीम प्रसादसिंग बडेला आणि निरज वेखंडे अशी चौघांची नावे आहेत. यातील उमरान राहणार, मुंब्रा, निरज राहणार पालघर, तर इतर दोघे आरोपी भायखळ्यातील रहिवासी आहेत. त्यांच्याकडून पाचशे रुपयांच्या दोनशे बोगस नोटांसह नोटा बनविण्यासाठी लागणारे साहित्य पोलिसांनी जप्त केले. चौघांनाही स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही यशस्वी कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक जितेंद्र शिंगोटे, सहायक पोलीस निरीक्षक सुहास माने, पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील या पथकाने केली आहे.