आदिवासी शेतकऱ्याच्या नावावर गुजरातच्या कंपनीचा ५० कोटींचा रॉयल्टी घोटाला : वनविभागाच्या जमीनीमधे १० लाख ब्रास मातीचे उत्खनन.. सामाजीक कार्यकर्ते शरद पाटील यांची वनमंत्र्यांकडे तक्रार
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640
मुंबई-वडोदरा एक्सप्रेस हायवेच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर माती व मुरूमची आवश्यकता आहे. त्यासाठी आदिवासी शेतकऱ्यांच्या जमीनी भाड्याने घेऊन त्यामधे नियमबाह्य उत्खनन करून गौणखनीजाची विक्री करणाऱ्या दलालांची टोळी पालघर जिल्ह्यामधे कार्यरत झाली आहे. या दलालांच्या टोळीने मोठा रॉयल्टी घोटाळा केला असल्याचे उघडकीस आले असून सामाजीक कार्यकर्ते शरद पाटील यांनी मुख्यमंत्री व वनमंत्री यांच्याकडे लेखी निवेदनाने तक्रार केली आहे.
मुंबई-वडोदरा एक्सप्रेस हायवेचे काम गुजरात येथील माॅन्टोकार्लो वडोदरा एक्सप्रेसवे प्रा. ली. या कंपनीने मासवन ते गंजाड या दरम्यांतील ५०.७०० किमी ते ७७.००० किमी या परीसरामधे माती व मुरूम भरावाचे काम घेतले आहे. हा भराव करण्यासाठी कंपनीने नागझरी, ता. पालघर येथील एका दलालामार्फत विक्रमगड तालुक्यातील आदिवासी शेतकरी श्री. गणपत नावजी नडगे यांची सर्वे नं. १२६/१ मधील २.३९ हेक्टर जमीन भाड्याने घेतली होती. मात्र या जमीनीतुन नियमबाह्यरित्या मोठ्या प्रमाणावर उत्खनन केल्यानंतर याच जमीनी लगत असलेल्या वनखात्याच्या व वनविकास महामंडळाच्या (FDCM) जमीनीमधुन सुमारे १० लाख ब्रास पेक्षा जास्त माती व मुरूमचे उत्खनन केले आहे. त्यासाठी शेकडो झाडांची कत्तल केली आहे. यासंदर्भात शरद पाटील यांनी तक्रार करताच कासा FDCM च्या अधिकाऱ्यांनी कंपनीचे ५ डंपर मातीची वाहतुक करताना पकडले व त्यांच्यावर कारवाई केली आहे.
यासंदर्भात बोलताना शरद पाटील यांनी सांगितले की, माॅन्टोकार्लो कंपनीने पालघर जिल्हाअधिकारी कार्यालयामधे फक्त ८५००० ब्रासचीच रॉयल्टी भरली आहे. तर सुमारे ५० कोटीहुन अधिक रॉयल्टी बुडवली आहे. या रॉयल्टी घोटाळ्यामधे महसुल व वनविभागाचे अधिकारी सामील आहेत. FDCM च्या जागेमधुन उत्खनन करताना सर्व्हे नकाशा बदलला आहे. तर वनअधिकाऱ्यांना पैसे देऊन उत्खनन केले व झाडे तोडली आहेत. कोंडगाव, ता. विक्रमगड येथुन गौणखनीजाची वाहतुक करताना सर्व नियम पायदळी तुडवले आहेत. म्हणूनच ज्या जागेवर उत्खनन झाले आहे, त्या जागेचे त्रयस्थ यंत्रणेमार्फत मोजमाप करावे, जेवढे उत्खनन झाले आहे तेवढी रॉयल्टी दंडासह वसुल करावी, वृक्षतोडीमधे व वनखात्याच्या जमीनीमधे झालेल्या उत्खननास जबाबदार असणाऱ्या वनअधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अवैध वाहतुक करणारी सर्व वाहने जप्त करावीत, अशी मागणी शरद पाटील यांनी निवेदनात केली आहे.
दरम्यांत तक्रार झाल्यानंतर वनविभागाने ५ डंपर पकडुन कारवाईचा देखावा केला मात्र वाहतुक करण्यासाठी ६५ डंपर व ८ पोकलन वनअधिकाऱ्यांनी घेऊन सोडून दिली असाही आरोप शरद पाटील यांनी आपल्या निवेदनामधे केला आहे.