युद्धखोर रहायचे की समरस रहायचे याचा विवेकी निर्णय प्रत्येक व्यक्तीने स्वतः घ्यावा ,,,,,,

ऍड अविनाश टी काले , अकलूज , डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक , तालुका माळशिरस , जिल्हा सोलापूर मो न 9960178213
मी एक सर्वसाधारण भारतीय नागरिक आहे , फार मोठा नेता , किंवा समाज मनावर अधिराज्य गाजवणारा कोणी मोठा नेता नाही , माझे सामाजिक योगदान ही फार मोठे आहे असे मी म्हणत नाही , मी अगदी सूक्ष्म आहे ,
पण माझा जन्म अश्या समाजात झाला ज्याचा इतिहास हा संघर्ष मय होता , इतिहासात त्याला दास व गुलाम बनवून त्याचा स्पर्श ही निषिध्द ठरवला गेला होता
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रम आणि अस्पृश्यतेच्या विरोधातील वैचारिक संघर्ष आणि राज्य घटनेतील त्यांनी केलेल्या तरतुदी यामुळे आमचा तो दाह कमी झाला , आणि किमान नागरिकत्वाचे , व विकासाच्या कमी अधिक संधी आम्हाला ही प्राप्त झाल्या त्या समाजातून मी आलो , त्यांच्या प्रति आमच्या मनात केवळ आणि केवळ कृतज्ञता आहे , आणि आम्ही नेहमीच त्यांचे समोर नत मस्तक होतो
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू मधील चातुर्वर्ण्य व्यवस्थेला नकार देत , या व्यवस्थेमधून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणून बौद्ध धम्म याचा स्वीकार केला , या पूर्वीची प्रक्रिया म्हणून अनेक पर्याय त्यांचे समोर होते , आणि या पर्यायातील एक पर्याय त्यांना भावला ज्याची मुळे ही भारतीय मातीत रुजलेली होती , जी श्रमन संस्कृती म्हणून ओळखली जात होती व्यक्तिगत व सार्वजनिक सदाचार , निती मूल्य , शांती , आणि अहिंसा , ज्याची मूल्य होती , व्यभिचार आणि नशा खोरी , आणि युद्ध या बाबी धम्म संस्कृतीला अमान्य होती व आहेत
या आदर्श प्रमाणे माझा समाज वाटचाल करेल आणि जागतिक पातळीवर तो आपला आदर्श स्थापित करेल अशी आशा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना होती
घटनात्मक राजवट अस्तित्वात आल्या नंतर , संघर्ष कसा करावा? या संबंधी विवेचन करताना हा संघर्ष घटनात्मक चौकटीत करावा असे मार्गदर्शन त्यांनी केले आणि समाजाची वाटचाल करताना त्या मार्गातील खाच खळगे , काटे कुटे याची तमा न बाळगता शॉर्ट कट म्हणून जाणाऱ्या रक्त रंजीत क्रांती मार्गाला त्यांनी त्यांच्या जीवनातून हद्दपार केले ,
जेंव्हा देशाची फाळणी द्वी राष्ट्र सिंधांताच्या आधारे होत होती , तेंव्हा अस्पृश्य वर्गासाठी ब्रिटिश शासनाच्या सहकार्याने त्यांना स्वंतत्र राष्ट्राची मागणी करता आली असती ! पण त्यांनी ती केली का? तर याचे उत्तर नाही असे आहे त्याच वेळेला त्यांनी अस्पृश्य वर्गासाठी स्वंतत्र मतदार संघ मागितला आणि दोन मताधिकार मागितले होते ,,या मागचे विचार काय होते ? तर आमचे प्रश्न सोडवण्या साठी आमचे खरे लोक प्रतिनिधी निवडले जावेत , आणि त्यांना निवडण्याचा अधिकार फक्त आम्हाला हवा,आणि उच्च वर्णीय समाजातील असे लोक प्रतिनिधी निवडून जावेत जे अस्पृश्य वर्गाचे ही हित रक्षण करतील ,,,,या पैकी पुणे करारा ने आमच्या वाट्याला राजकीय आरक्षण आले , आणि ते ही संयुक्त मतदार संघ आले ,,,,
म्हणाजे जे बहुसंख्य समाजा समवेत राहू शकतात , अश्या वर्गाचे लोक लोकप्रतिनिधी म्हणून निवडून जाण्याचा मार्ग मोकळा झाला या निवडणुका मुळे , समाज एक जिनसी होण्यास मदत झाली असती परंतु कधी? तर अस्पृश्य वर्गातील शिक्षित व विवेकवादी लोक प्रतिनिधी निवडले गेले असते तर ,काँग्रेस पक्षाच्या निम सरंजाम दार वर्गाने , अशी शिक्षित उमेदवार आणि लोकप्रतिनिधी दिलेच नाहीत , उलट समाजातील कमी शिक्षित , किंवा स्वार्थांध व्यक्तींना लोक प्रतिनिधी बनवले , अश्या रबर स्टॅम्प लोक प्रतिनिधी मुळे समाज एक जिनसी बनला नाही , तो बनावा या साठीचे प्रयास कधीच कुणी केले नाहीत ,
इकडे सामाजिक जीवनात ही हेच घडतं राहिले “मानव मुक्ती “चां मार्ग फक्त आमच्याच मार्गाने होतो हा अट्टाहास धरून , धर्मांतरीत करण्या साठी चे शिक्षण म्हणून प्रबोधन या नावाखाली “हिंदू धर्म ~चिकित्सा” या कायम स्वरुपी राहिल्या , आणि प्रत्येक रूढी , प्रत्येक परंपरा , कशा मूर्ख आहेत ? हजारो वर्षापूर्वी ची सामाजिक व्यवस्था ही मातृसत्ताक होती की पितृ सत्ताक? अशा शेकडो बाबीची दररोज चिरफाड आणि चिकित्सा चालूच राहिल्या बरे त्यात ही कोणी धर्मानंद कोसंबी , प्राच्य विद्या पंडित शरद पाटील , अश्या सारखे विद्वान च राहिले असे ही नाही
हातात मोबाईल आला , एखादे दुसरे पुस्तक वाचले की , आणि इतिहास काळातील संघर्ष ऐकीव ज्ञात असला की , असा प्रत्येक जण समाजाला प्रबोधित करण्या साठी पुढे सरसवू लागल्या ने ,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्य , रूढी परंपरा याचे श्रद्धा पूर्वक आचरण करण्याचे सर्व नागरिकांचे स्वातंत्र्य यांचे हनन आम्ही करत आहोत याचे ही भान न राहिल्याने , हळू हळू बहुसंख्य हिंदू समाजातील लोकांचे मत आमच्या प्रति कलुशित होत गेले , याचा पत्ता ही आम्हाला लागलेला नाही याचा परिणाम म्हणून नवबौध्द समाजाचा राजकारणातील लोकप्रतिनिधी बनण्याचा टक्का प्रमाण घसरले हे वास्तव आहे
जाती हा हिंदू मधील भाग आहे? की बौद्ध धम्मातील?
जर त्या हिंदू तील भाग असतील तर , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जेंव्हा धम्म स्वीकारला नव्हता तो पर्यंत जाती निर्मूलन व त्याची वैचारिक मांडणी त्यांनी केली आज एस सी , एस टी, ओबीसी मधील किती जाती कोणत्या जाती विरोधात संघर्ष करतात? कुंभार समाज , लोहार समाजाशी वैर करतो का? माळी समाज कुंभार , लोहार ,किंवा अन्य कोणत्या समाजाशी वैरभाव ठेवतो?
माझी जात मला नष्ट करायची आहे असा म्हणणारा समाज आज एक तरी अस्तित्वात आहे काय?
हे सगळे समाज हिंदू नावाने एकत्रित आले व राहिले तर ती आम्हाला आपत्ती का वाटावी?जेंव्हा हिंदू कोडबिल बनले , त्यात लिंगायत , बौद्ध , जैन , शीख , हे का समविष्ट झाले ? याचे कारण त्यांचा विवाह हा संस्कार आहे करार नाही ,डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लिम पर्सनल लॉ , स्वंतत्र ठेवला परंतु बौद्ध समाजाचा पर्सनल लॉ स्वंतत्र आहे काय? त्यांचे वारसा कायदे भिन्न आहेत काय? द्विभार्या प्रतिबंधक कायदा नवबौध्द समाजाला लागू नाही काय?
हे आत्ता सर्व पुन्हा एकदा तपासले पाहिजे ,ज्या बाबी ना सामाजिक स्वीकार हार्यता नाही अशा बाबी करून आपण काय साध्य करू इच्छितो?मान्य आहे की मुघल शासकांच्या काळात तत्कालीन व्यवस्थेत असणारे शासक वर्गातील लोकच शासक होते ,या मुघल सम्राटांनी जाती व्यवस्थेतील खालच्या वर्गाच्या उन्नत्ती साठी , त्यांच्या मानवी मुल्या साठी , उच्च वर्णीय शक्तीचे दमण करून त्यांना न्याय दिला आहे काय? त्यांनी फक्त शासक म्हणून भूमिका घेतली , त्यांचा आदर्श आम्ही गौरवांकित करण्याचे आमच्या साठी कारण च काय?
ज्यांनी छत्रपती शिवरायांना कैद केले , आणि युवराज संभाजी महाराज यांना हाल हाल करून मारले , त्यांचे प्रति समग्र महाराष्ट्रीयन माणसात चीड आणि संताप असताना त्या औरंगजेबाला फुले अर्पण करून आम्ही काय दर्शवणार आहोत?जे जे बहुसंख्य समाजाचे नायक असतील , आदर्श असतील ते ते आम्हाला मान्य नाहीत , असा अर्थ ध्वनित करण्यातून नेमके काय साध्य करणार? या सर्व अनाकलनीय बाबी चालू आहेत , राजकारण व लोकसंख्येची समीकरण म्हणून हे प्रयोग केले जातील , पण यातून सामाजिक , राजकीय दृष्ट्या नवबौध्द समाजाचे अलगी करण अजून वेगाने होईल , आणि त्याचे दृश्य परिणाम समाजालाच भोगावे लागतील
माझ्या सारख्या विवेक वादी माणसाचे समाज ऐकेल अशी मला खात्री नाही , माझ्या सारख्या कफल्लक व जातीय गठ्ठा समवेत नसलेल्या माणसाची आजच्या संसदीय राजकारणात कवडी ची ही किंमत असणार नाही , हे ही मला माहित आहे पण मला शांती हवी आहे ,,, माझ्या पुढच्या पिढीला शांती ने जगून स्वतःच्या परिश्रमाचा आधारे विकास करून घेण्याची संधी मला त्यांचे हातात द्यायची आहे मला गाव , तालुका आणि राज्यात शांतीने राहणारा एक जिनसी समाज हवा आहे , या सर्व जाती धर्मातील माणसाशी मला समरस व्हायचं आहे , तोच शांती पूर्ण , विवेक वादी , उन्नती चां मार्ग आहे अशी माझी धारणा आहे व श्रध्दा ही आहे
जय भीम ,,, जय शिवराय ,,, जय अहिल्या देवी ,,, जय लहुजी , जय अण्णा भाऊ
तमाम महापुरुषांना साक्षी ठेऊन त्यांना समर्पित ,,,,,!



