महाराष्ट्र

शरद पवारांच्या राजकारणातून निवृत्तीच्या घोषणेने देशातील राजकीय क्षेत्राला भुकंप, आता पुढे काय?

शरद पवारांच्या निर्णयाने अजित पवार, जयंत पाटील झाले भावूक, निर्णय मागे घेण्यासाठी आग्रह

इंदापूर प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, 8378081147

आम्ही पवारसाहेबांच्या नावानं मतं मागतो, त्यांच्या नावाने पक्षाला मतं मागतात. तेच बाजूला गेले तर आम्ही कोणाला घेऊन लोकांसमोर जायचे. देशातील लोकांसाठी ते पक्षाचे अध्यक्ष असणे गरजेचे आहे. त्यांनी असा निर्णय घेणे, देशातील कोणत्याही व्यक्तीला मान्य नसेल. कोणत्याही परिस्थितीत त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रडतच केली.

लोक माझे सांगाती भाग दोन या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर यशवंतराव चव्हाण सभागृह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी डोक्यावर घेतले आहे. पवारसाहेब जोपर्यंत निर्णय मागे घेत नाहीत, तोपर्यंत आम्ही सभागृह सोडणार नाही, अशी भूमिका नेते, आमदार, खासदार आणि कार्यकर्त्यांनी घेतली आहे. स्वतः अजित पवार, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील हे निर्णय मागे घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
जयंत पाटील म्हणाले की, शरद पवार यांच्या अनुभवाचा फायदा आम्हाला हवा आहे. आमच्या लहानपणापासून आम्ही त्यांच्याकडे पाहूनच राजकारण करत आलो आहोत. त्यांची स्फूर्ती घेऊन राजकारणात वावरतो. राजकारण करत आलो आहे. त्यांनी अलीकडच्या काळात भाकरी फिरवण्याचा उल्लेख केला होता. पवारसाहेब आम्ही तुम्हाला सर्व अधिकार देतो. पण, देशाच्या सवोच्च ठिकाणी तुमची जी प्रतिमा ती दुसरी कोणाला येणार नाही.

तुम्ही आम्हा सर्वांचे राजीनामे घ्या. तुम्हाला पक्ष नव्या लोकांच्या हातात द्यायचा आहे, तर तो द्यावा. पण पक्षाच्या प्रमुखपदावरून बाजूला जाणं, हे कोणच्याही हिताचे नाही. तुम्ही थांबणार असाल तर आम्ही सर्वजण थांबतो. हा पक्ष ज्यांना चालवायचा आहे, त्यांना चालवू द्या, अशी विनंतीही जयंत पाटील यांनी केली. पवारसाहेबांना परस्पर निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार नाही. तो देशातील कोणालाही मान्य नसेल. त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, अशी मी विनंती करतो, असेही त्यांनी नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button