अकलुज पोलीस ठाण्यात खंडणी व फसवणुकीचा गुन्हा दाखल.सुभाष सरतापे विरोधात कारवाई

Times 9 Marathi News Network
अकलुज : कायद्याची माहिती असल्याचा बनाव रचून, कोर्टात व पोलिसांत चालढकल करण्याची अन् पुन्हा हाफमर्डरच्या केसमध्ये अडकवण्याची भीती दाखवून एका महिला मजुराकडून २५ हजार रुपये उकळल्याचा आणि आणखी ४ हजार रुपयांची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अकलुज पोलीस ठाण्यात सुभाष सरतापे याच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे नेमकी घटना?
बाबरी पूल (महाळुंग, ता. माळशिरस) येथील रहिवासी लक्ष्मी महादेव सरवदे (वय ५०, व्यवसाय: मजुरी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक १२ जून २०२६ ते ५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आरोपी सुभाष सरतापे (रा. बाबरी पूल, महाळुंग) याने त्यांना वारंवार भेटून, “तुमचा मुलगा आणि जावई यांचा जामीन करण्यासाठी अन् चार्जशीट कमी करून पाठवण्यासाठी साहेबांचं तोंड मिटवावं लागेल, मला कायद्याची माहिती आहे,” असे सांगितले.
तसेच “पैसे दिले नाहीत तर तुमचं कलम कमी होणार नाही आणि चार्जशीटही जाणार नाही, तुम्हाला सगळ्यांना परत हाफमर्डरच्या केसमध्ये आत टाकतील,” अशी धमकी देऊन फिर्यादीकडून २५,००० रुपये बळजबरीने उकळले.
पहिले २५ हजार रुपये उकळल्यानंतरही आरोपी सरतापे याचे समाधान झाले नाही. त्याने पुन्हा फिर्यादी लक्ष्मी सरवदे यांना भेटून, “चार्जशीटसाठी ४,००० रुपये द्यावे लागतील आणि हाफमर्डरच्या गुन्ह्यात तुमचे नाव न येण्यासाठी अजून पैसे द्यावे लागतील. पैसे दिले नाहीत तर पोलीस काहीतरी उलाढाल करतील आणि तुमच्या पोरांना व तुम्हाला परत जेलमध्ये ठेवतील,” अशी वारंवार भीती दाखवली.
आरोपीच्या या सततच्या त्रासाला आणि धमक्यांना कंटाळून अखेर लक्ष्मी सरवदे यांनी अकलुज पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.
फिर्यादीच्या अर्जावरून अकलुज पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०८ (२), ३०८ (३), ३०८ (७) (खंडणी/जबरदस्तीने पैसे उकळणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा वर्दी रिपोर्ट माळशिरस न्यायालयाकडे पाठवण्यात आला असून, अकलुज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निरज उबाळे यांच्या आदेशानुसार पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल परांडे हे करत आहेत.



