प्रभाग क्र. ४ मधील प्रलंबित विकासकामे तात्काळ मार्गी लावावीत; अन्यथा १५ ऑगस्टपासून बेमुदत साखळी उपोषण – नगरसेवक मोहसिन शेख

नौशाद मुलाणी संपादक Times 9 Marathi News Network
अकलूज : अकलूज नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्र. ४ मधील अनेक मूलभूत नागरी सुविधा व विकासकामे दीर्घकाळापासून प्रलंबित असल्याने नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सर्व प्रश्नांबाबत तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी नगरसेवक मोहसिन शेख यांनी नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष व मुख्याधिकारी, अकलूज नगरपरिषद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानालगत झालेली अतिक्रमणे हटवून संरक्षण भिंत बांधणे, शासकीय मोजणी करून अधिकृत हद्द निश्चित करणे, रमामाता चौक व पंचशीलनगर येथील सभागृहांचे नूतनीकरण, कुरेशी मशीद परिसरात नवीन सभागृह उभारणे, रमामाता चौक, पंचशीलनगर, काझी गल्ली, दत्त चौक व देशमुख गल्ली येथे नवीन स्ट्रीट लाईट पोल बसविणे, जुने हातपंप व बोअरवेलची दुरुस्ती, नियमित मच्छरनाशक व निर्जंतुकीकरण फवारणी, भटकी कुत्री, डुकरे व इतर भटक्या जनावरांचा बंदोबस्त तसेच जुन्या ड्रेनेज लाईनची दुरुस्ती करून सांडपाण्याचा योग्य निचरा करण्याची मागणी करण्यात आली आहे.

नगरसेवक मोहसिन शेख यांनी सांगितले की, प्रभाग क्र. ४ हा अकलूजमधील जुना व दाट लोकवस्तीचा भाग असून येथील नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने या मागण्यांचा तातडीने सकारात्मक विचार करून सर्व विकासकामे प्राधान्याने मार्गी लावावीत.
तसेच, या निवेदनाची दखल घेऊन तात्काळ कार्यवाही न झाल्यास दि.१५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजल्यापासून अकलूज नगरपरिषद कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा नगरसेवक मोहसिन शेख यांनी दिला आहे.
यावेळी समीर काझी,फारूक शेख, शोएब बागवान, रफिक तांबोळी, पिरखान शेख सह प्रभागातील नागरिक उपस्थित होते.



