शहर

जलदुर्ग जंजिरे विरार अर्नाळा: समुद्राच्या छाताडावर कोरलेला मराठ्यांच्या आरमाराचा अजिंक्य इतिहास!

समुद्राच्या अथांग लाटांशी झुंजत, शतकांनुशतके सह्याद्रीची धगधगती जिद्द उराशी बाळगून उभा असलेला ऐतिहासिक ठेवा म्हणजे—’जंजिरे अर्नाळा’!

गरजती अथांग लाटा, अन्‌ उधाणलेला सागर,
गर्जावा भगवा निसटून, असा पराक्रमाचा जागर!
सिंधूच्या वक्षस्थळावर, जिथे तुषार शिवशाहीचे उडले,
त्या जलदुर्गाच्या ताकदीपुढे, काळाचेही शीश झुकले!”

 छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्याची स्थापना करताना 'ज्याचे जलदुर्ग, त्याचे समुद्र' हा महान मंत्र दिला. महाराजांनी सिंधुदुर्ग, विजयदुर्ग आणि पद्मदुर्ग यांसारख्या बलाढ्य जलदुर्गांची निर्मिती करून मराठ्यांचे आरमार मजबूत केले. शिवछत्रपतींचा हाच जलदुर्गांचा वारसा आणि समुद्रावरील वर्चस्व मिळवण्याचे धोरण पुढे पेशव्यांनी ताकदीने चालवले. याच शिवशाहीच्या प्रेरणेतून आणि मराठ्यांच्या पराक्रमातून आकाराला आलेला एक अद्वितीय आणि अजिंक्य जलदुर्ग म्हणजेच अर्नाळा किल्ला.
पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात, वैतरणा नदी आणि समुद्राच्या संगमावर वसलेला हा किल्ला मराठ्यांच्या आरमाराच्या आणि शौर्याच्या दैदीप्यमान इतिहासाची साक्ष देत आजही खंबीरपणे उभा आहे.
  सह्याद्रीची वाघीण जणू, उभी समुद्राच्या दारी,
  अजिंक्य हा अर्नाळा किल्ला, मराठ्यांची शान भारी, 
          इ.स. १५१६ गुजरातचा सुलतान महमूद बेगडा याने वैतरणेच्या मुखावर राजकीय व व्यापारी दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या बेटावर प्राथमिक स्वरूपाचे बांधकाम केले.इ.स.१५३०पोर्तुगीजांनी हा ताबा मिळवून येथे आपल्या सैन्याची चौकी उभारली आणि तटबंदी केली. इ.स. १७३७ श्रीमंत बाजीराव पेशवे आणि त्यांचे बंधू चिमाजी आप्पा यांनी वसईच्या मोहिमेदरम्यान पोर्तुगीजांचा पराभव करून अर्नाळा किल्ला मराठ्यांच्या छत्रछायेखाली आणला. बाजीरावांच्या आज्ञेवरून शंकरजी केशव यांनी या किल्ल्याची पुनर्बांधणी व भक्कम तटबंदी केली. ब्रिटिश काळ इ.स. १८१८ मराठेशाहीच्या अस्तानंतर हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.

किल्ल्याची रचना:
अर्नाळा हा किल्ला आयताकृती (चौकोनी)असून सुमारे ४ हेक्टर क्षेत्रफळावर पसरलेला आहे.किल्ल्याभोवती ३० ते ४० फूट उंचीची भक्कम व अखंड तटबंदी आहे. तटबंदीचे रक्षण करण्यासाठी ९ मजबूत बुरूज उभारण्यात आले आहेत. यामध्ये भैरव, भवानी आणि बावा बुरूज प्रमुख आहेत.गडाला सुरक्षिततेचे कवच देणारे तीन मुख्य दरवाजे आहेत. उत्तराभिमुख असलेले मुख्य महाद्वार आणि त्याच्या दोन्ही बाजूंस असलेले दोन उत्तुंग, अवाढव्य बुरूज पाहताच क्षणी गडाच्या पराक्रमाची जाणीव करून देतात. दरवाजाच्या चौकटीवर सिंह आणि हत्तीची डौलदार व जिवंत शिल्पे कोरलेली असून, त्याच्यावर असलेला ऐतिहासिक शिलालेख गडाच्या प्रदीर्घ इतिहासाचे मूक साक्षीदार म्हणून आजही दिमाखात उभा आहे. त्यात ‘बाजीराव अमात्य सुमती आज्ञापिले शंकर! पाश्चात्त्यासि वधूनि सिंधु उदरी बांधा त्वरे जंजिरा!!,’ असे कोरलेले आहे.

या शिलालेखावरून श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या आज्ञेने शंकरजी केशव यांनी या जलदुर्गाचे पुनरुज्जीवन केले हे सिद्ध होते. किल्ल्याच्या समोर उभे राहताच डाव्या बाजूस अथांग समुद्राच्या छाताडावर खंबीरपणे पाय रोवून उभा असलेला ‘हनुमंत बुरूज’ नजरेत भरतो. गडाच्या पोटाशी त्र्यंबकेश्वर, कुलस्वामिनी भवानी माता आणि महादेवाच्या पवित्र मंदिरांचे अधिस्थान आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रांगणात दगडी पायऱ्यांनी सजलेले अतिशय देखणे, अष्टकोनी तळे तत्कालीन शिल्पकलेची साक्ष देते, तर गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर कालिकामातेचे शक्तीपीठ/मंदिर वसलेले आहे. गडावर पिण्याच्या गोड्या पाण्याच्या ५ ते ६ बांधीव विहिरी आहेत, ज्या शेकडो वर्षांनंतरही आजही सुस्थितीत टिकून आहेत. मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी वर असणाऱ्या उंचवट्यावरून संपूर्ण किल्ल्याचा आतील प्रदेश एकाच नजरेत टिपता येतो. हीच ती मोक्याची जागा, जिथे मराठ्यांचे असीम शौर्य आणि अस्मितेचे प्रतीक असणारा भगवा ध्वज अथांग आकाशात दिमाखाने फडकत असे.”दगडांत कोरला इतिहास हा, दगडांत श्वास मराठ्यांचा,किल्ले जपून ठेवूया सारे, हाच वसा स्वाभिमानाचा!” अर्नाळ्यासारखे गड-किल्ले हे केवळ दगडांचे बांधकाम नसून आपल्या संस्कृतीचा आणि अस्मितेचा जिवंत पाठीराखा आहे. किल्ले जपणे खालील कारणांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराज, पेशवे आणि अगणित मावळ्यांच्या शौर्याची व बलिदानाची प्रत्यक्ष साक्ष देतात. आजचे किल्ले सुरक्षित राहिले, तरच येणाऱ्या पिढ्यांना आपला अजरामर इतिहास, आरमार कौशल्य आणि स्थापत्यशास्त्र समजेल.


आज अर्नाळा किल्ल्याच्या सभोवताली ३ ते ४ हजार कोळी बांधवांची वस्ती आहे. किल्ल्याच्या आत काही प्रमाणात शेतीही केली जाते. काळाच्या ओघात किल्ल्याची थोडी पडझड झाली असली, तरीही समुद्राच्या लाटांशी दोन हात करत उभा असलेला हा ‘जंजिरे अर्नाळा’ मराठ्यांच्या आरमाराची आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी रुजवलेल्या जलदुर्ग परंपरेची अजरामर साक्ष देतो!
🔰 शब्दांकन.. डॉ. पूनम प्रकाश कुडू ( भोईर)🔰 भ्रमणध्वनी क्रमांक…9152802550

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button