शहर

सफाळे-नारोडा येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त निसर्गसंवर्धनाचा संकल्प; ‘एक व्यक्ती–एक झाड’चा संदेश

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक: 7030516640

आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी तसेच जल, जंगल आणि जमीन यांच्या संरक्षणासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे आदिवासी नेते निसर्गवासी काका धोदडे यांच्या जयंतीनिमित्त आणि जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून सफाळे-नारोडा येथे वृक्षारोपण व आंब्याच्या रोपांचे वाटप करण्यात आले. आदिवासी हक्क व अधिकार विचार मंचाच्या वतीने आयोजित या उपक्रमातून निसर्गसंवर्धनाचा प्रभावी संदेश देण्यात आला.

स्थानिक प्लॉटधारकांना आंब्याची रोपे वितरित करून प्रत्येकाने आपल्या परिसरात किमान एक तरी झाड लावावे आणि केवळ रोप लावण्यापुरते न थांबता त्याचे संगोपन करून ते मोठे करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

वाढते शहरीकरण, बेसुमार वृक्षतोड आणि पर्यावरणाचा ऱ्हास यामुळे निसर्गाचा समतोल धोक्यात येत आहे. त्यामुळे वृक्षलागवड ही काळाची गरज असून, लावलेले झाड जगविणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. झाडांमुळे पर्यावरणाचा समतोल राखण्याबरोबरच भावी पिढ्यांसाठी शुद्ध हवा, सावली, पाणी आणि जैवविविधता टिकवून ठेवण्यास मदत होते, याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी काका धोदडे यांच्या कार्याला आणि निसर्गसंवर्धनाच्या विचारांना आदरांजली वाहण्यात आली. जल, जंगल आणि जमीन यांच्याशी आदिवासी समाजाचे असलेले नाते हे केवळ परंपरेपुरते मर्यादित नसून निसर्गाचे संरक्षण करण्याची जबाबदारीही त्यातून अधोरेखित होते. त्यामुळे काका धोदडे यांच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीची जोड देणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असा सूर यावेळी व्यक्त करण्यात आला.

काशीराम वरठा आणि नितीन बोंबाडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. वृक्षारोपणाचे उपक्रम केवळ एका दिवसापुरते मर्यादित न ठेवता वर्षभर वृक्षसंवर्धनाची चळवळ उभी करणे आवश्यक आहे. प्रत्येक कुटुंबाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन केल्यास पर्यावरण संवर्धनासाठी मोठे योगदान देता येईल, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी आदिवासी एकता मित्र मंडळ, पालघर तालुका अध्यक्ष संतोष बोंबाडी यांच्या हस्ते स्थानिक प्लॉटधारकांना आंब्याच्या रोपांचे वाटप करण्यात आले. फळझाडांची लागवड केल्याने पर्यावरण संवर्धनासोबतच भविष्यात कुटुंबांना फळांचे उत्पादन आणि आर्थिक लाभ मिळू शकतो, असेही यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमाला काशीराम वरठा, नितीन बोंबाडे, बबन धांगडा, संतोष बोंबाडी, अविनाश भोईर, प्रमोद सांबरे, किसन बोंबाडी, राजन हरवटे, तुलसी बोंबाडी, बाबू मालकरी, पद्माकर मालकरी, दिलीप धांगडा, किशोर धांगडा, बली बुजड, संतोष परेड, लीला तळेकर, विनोद सुतार, मुड्या खैराडी, कमलाकर घाटाळ, सीता डुकले, मड्या खैराडी, अरुण खैराडी, नंदा पिलेना, मानसी बोंबाडी, मंगला भोईर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

या उपक्रमासाठी आदिवासी स्वराज्य संघटनेचे सल्लागार दिनकर वाढण यांचे विशेष सहकार्य लाभले.

एक व्यक्ती–एक झाड’चा निर्धार

काका धोदडे यांच्या जयंतीनिमित्त केवळ अभिवादन न करता त्यांच्या निसर्गसंवर्धनाच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीची जोड देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश ठरला. प्रत्येकाने किमान एक झाड लावून ते जगविण्याचा संकल्प केला, तरच जागतिक आदिवासी दिनाचा आणि काका धोदडे यांच्या विचारांचा खऱ्या अर्थाने सन्मान होईल, असा संदेश यावेळी देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button