शहर

“नगरसेवक महेश शिंदे कुठे गायब?” : सस्पेन्स व्हिडिओने अकलूजच्या राजकीय वर्तुळात खळबळ; लक्ष १ तारखेकडे!

Times 9 Marathi News Network

अकलूज : भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक ८ चे नगरसेवक महेश शिंदे गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रम आणि उपक्रमांमध्ये तुलनेने कमी दिसत असल्याने त्यांच्या निष्क्रियतेबाबत विविध चर्चा रंगल्या होत्या. अशातच, त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून प्रसारित झालेल्या एका गूढ (‘सस्पेन्स’) व्हिडिओने संपूर्ण अकलूजच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे.

प्रसारित झालेल्या या व्हिडिओमध्ये कोणत्याही घटनेचा थेट किंवा स्पष्ट खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र, “काही दिवसांची शांतता… काहीतरी मोठं घडण्याची चाहूल… १ तारीख लक्षात ठेवा…” अशा मजकुरासह देण्यात आलेल्या सूचक संदेशामुळे स्थानिक नागरिकांसह राजकीय विश्लेषकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

नगरसेवक महेश शिंदे यांच्या सोशल मीडिया ‘इनसाइट्स’ (Insights) नुसार, या व्हिडिओला अवघ्या काही तासांतच १३ ते १४ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. “१ तारखेला नेमकं काय घडणार?”, “महेश शिंदे कोणती नवी भूमिका किंवा निर्णय घेणार?” याविषयी सोशल मीडियासह प्रभागातील चौकाचौकांत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

गेल्या काही काळापासून प्रभागातील नागरी समस्या, विकासकामे आणि नागरिकांच्या प्रश्नांवर सातत्याने आक्रमक पाठपुरावा करणारे महेश शिंदे अचानक शांत झाल्याने नागरिकांमध्ये विविध शंका उपस्थित होत होत्या. अशा स्थितीत आलेल्या या रहस्यमय व्हिडिओने सस्पेन्स आणखी वाढवला आहे.

आता १ तारखेला या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळणार की अकलूजच्या राजकारणात एखाद्या नव्या अध्यायाची सुरुवात होणार, याकडे संपूर्ण अकलूजकरांचे डोळे लागले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button