शैक्षणिक

जिजामाता कन्या प्रशालेच्या उभारणीत शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजचा व्यापक दृष्टिकोन.उद्योगमहर्षी उदयसिंह मोहिते-पाटील यांच्या जयंतीनिमित्त विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न

Times 9 Marathi News Network

अकलूज : शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज संचलित जिजामाता कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, अकलूज येथे उद्योगमहर्षी उदयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या जयंतीनिमित्त प्रशाला स्तरावरील विज्ञान प्रदर्शनाचे उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वी आयोजन करण्यात आले. विद्यार्थिनींमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासा, चिकित्सक विचार, प्रयोगशीलता आणि नवोपक्रमाची वृत्ती निर्माण व्हावी, या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

या विज्ञान प्रदर्शनात सुमारे ४५० विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विज्ञानाचा दैनंदिन जीवनाशी असलेला संबंध, पर्यावरण संवर्धन, ऊर्जा बचत, तंत्रज्ञान आणि समाजोपयोगी उपक्रम अशा विविध विषयांवर आधारित प्रकल्प व विज्ञान प्रतिकृती विद्यार्थिनींनी अत्यंत आत्मविश्वासाने सादर केल्या. विज्ञानातील क्लिष्ट संकल्पना सोप्या व आकर्षक पद्धतीने मांडून विद्यार्थिनींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

या प्रदर्शनाला पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थिनींच्या उपक्रमांना प्रोत्साहन दिले. प्रकल्प समजावून सांगताना विद्यार्थिनींचे संवादकौशल्य, निरीक्षण, विश्लेषण व समस्या निवारण क्षमतेची प्रचिती उपस्थितांना आली.

प्रदर्शनाच्या पाहणीप्रसंगी सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटरचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे, स्थानिक प्रशाला व्यवस्थापन समितीच्या सदस्या सोनल माने-देशमुख, विज्ञान अभ्यासक प्रताप तोरणे, उदय उरणे, मुख्याध्यापिका सुनीता वाघ, पर्यवेक्षक संतोष अनगळ, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना विज्ञान अभ्यासक प्रताप तोरणे व उदय उरणे यांनी, “केवळ पाठ्यपुस्तकातील ज्ञान न घेता प्रयोग, निरीक्षण आणि प्रत्यक्ष कृतीतून विज्ञान समजून घेणे काळाची गरज आहे,” असे सांगत लहान वयात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

जिजामाता कन्या प्रशालेची उभारणी करताना शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूजने विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासाचा व्यापक दृष्टिकोन ठेवला आहे. शैक्षणिक गुणवत्तेसोबतच विज्ञान, कला, क्रीडा, वक्तृत्व आणि तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देऊन त्यांच्यातील सुप्त गुणांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे. या विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थिनींमध्ये ‘विज्ञान शिकण्यापेक्षा विज्ञान अनुभवण्याची’ भावना निर्माण झाली.

कार्यक्रमात प्रशालेचे सहशिक्षक ज्ञानेश्वर शेलार तसेच विद्यार्थिनी आर्या देवकर व अल्फिया सय्यद यांनी उद्योगमहर्षी उदयसिंह मोहिते-पाटील यांच्या जीवनकार्यावर विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिपाली राजमाने यांनी केले, तर सूत्रसंचालन शोभा खराडे यांनी केले. प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button