शिक्षणामुळे माणसाच्या जीवनाला नवी दिशा मिळते: डॉ. स्नेहल जानकरवेळापूर जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव व पालक मेळावा उत्साहात संपन्न

Times 9 Marathi News Network
वेळापूर : “शिक्षणात अज्ञानाचा अंधार दूर करण्याचे अथांग सामर्थ्य आहे. शिक्षण माणसाला चांगले विचार, उत्तम संस्कार आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता देते. शिक्षणामुळेच समाजातील भेदभाव, अंधश्रद्धा आणि वाईट प्रथांचे निर्मूलन शक्य असून, आजच्या काळात मुलगा आणि मुलगी दोघांनाही समान शिक्षण मिळणे काळाची गरज आहे. शिक्षणामुळेच माणसाच्या जीवनाला खऱ्या अर्थाने योग्य दिशा मिळते,” असे प्रतिपादन डॉ. स्नेहल जानकर यांनी केले.
येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित ‘प्रवेशोत्सव आणि पालक मेळाव्यात’ प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या मीनाक्षीताई सरतापे या होत्या.
याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी सुषमा महामुनी, वेळापूरचे सरपंच रजनीश बनसोडे, उपसरपंच नानासो मुंगूसकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा करिष्मा मुलाणी, उपाध्यक्षा मनीषा भानवसे, अनुराधा काटकर, अनिता बनसोडे, अर्चना भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना सरपंच रजनीश बनसोडे म्हणाले की, “देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रत्येक नागरिक शिक्षित होणे अत्यंत गरजेचे आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी लहानपणापासूनच विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणे आवश्यक आहे.”
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. नितीन चव्हाण यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर मुख्याध्यापक युन्नुस तांबोळी यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे शब्दसुमनांनी स्वागत करून त्यांचा यथोचित सत्कार केला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जीवन रणनवरे, पांडुरंग कुलकर्णी, सौ. आसराबाई जैन, सौ. कविता आवटे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार प्रदर्शन किरण घाडगे मॅडम यांनी केले. या सोहळ्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, माता-पालक समितीचे सदस्य, शिक्षकवृंद आणि ग्रामस्थ व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



