शैक्षणिक

अकलूजच्या श्रीम. किरण घाडगे – माने यांना शिक्षणशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी प्राप्त

अकलूज (प्रतिनिधी):
अकलूज येथील रहिवासी श्रीम. किरण घाडगे – माने यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून शिक्षणशास्त्र विषयात पीएच.डी. (Ph.D.) पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्या या विशेष यशाबद्दल अकलूजसह संपूर्ण माळशिरस तालुक्यातून त्यांचे कौतुक होत असून अकलूजच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

त्यांनी “A Study of the Current Status of Information and Communication Technology (ICT) Usage at the Primary Education Level in Solapur District” (सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक स्तरावर माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाच्या वापराची सद्यस्थिती) या महत्त्वपूर्ण विषयावर आपले संशोधन पूर्ण केले. बार्शी येथील कॉलेज ऑफ एज्युकेशनमधील डॉ. आर. ए. फुरडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे संशोधन कार्य तडीस नेले. हे संशोधन विशेषतः जिल्हा परिषदेच्या शाळांमधील माहिती तंत्रज्ञान साधनांची सद्यस्थिती आणि त्याच्या वापरातील अडचणींवर प्रकाश टाकणारे असून, शिक्षक व शासनासाठी ते दिशादर्शक ठरणार आहे.

ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या श्रीम. किरण घाडगे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण शिवणे (जि. सोलापूर) येथील जिल्हा परिषद शाळा व हायस्कूलमध्ये झाले. जुनियर कॉलेज सांगोला विद्यामंदिर, तर डी.एड. संभाजीराव शिंदे अध्यापक विद्यालय, सोलापूर येथे पूर्ण झाले.

त्यांनी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून पदवी, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून (IGNOU) बी.एड., तर एस.एन.डी.टी. विद्यापीठ मुंबई येथून एम.एड.ची पदवी प्राप्त केली. याशिवाय त्यांनी गव्हर्मेंट डिप्लोमा को-ऑपरेशन अँड अकाउंटन्सी (GD&A), शालेय व्यवस्थापन पदविका कोर्स आणि शिक्षणशास्त्र विषयातून सेट (SET) व नेट (NET) या दोन्ही कठीण परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केल्या आहेत.

सध्या त्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेळापूर (मुली) येथे सहशिक्षिका म्हणून कार्यरत असून, गेल्या २० वर्षांपासून त्या शिक्षण क्षेत्रात सेवा बजावत आहेत. ज्ञानदानाच्या पवित्र कार्यासोबतच त्यांनी सामाजिक बांधिलकीही जपली आहे:
उघडेवाडी शाळेत कार्यरत असताना त्यांनी स्वतः सायकली भेट देऊन ‘सायकल बँक’ उपक्रम सुरू केला, ज्याद्वारे अनेक गरजू विद्यार्थ्यांना सायकली उपलब्ध झाल्या.
गेल्या १० वर्षांपासून त्या आपल्या मुलांचे वाढदिवस जिल्हा परिषद शाळेत साजरे करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करतात. गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना त्या नियमित आर्थिक व शैक्षणिक मदत करतात.

“स्वतःचे प्रामाणिक कष्ट, थोरामोठ्यांचे आशीर्वाद, मार्गदर्शक व विद्यार्थ्यांच्या शुभेच्छांमुळेच हे यश शक्य झाले. माझ्या या प्रवासात आई-वडील, पती, मुले, घाडगे व माने परिवारातील सर्व सदस्य, सहकारी शिक्षक व गुरूवर्यांचा मोलाचा वाटा आहे.”
— डॉ. किरण घाडगे – माने

या उज्ज्वल यशाबद्दल माळशिरस तालुक्याचे माजी गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख, गटशिक्षणाधिकारी सुषमा महामुनी, विस्तार अधिकारी हुसेनसो बारस्कर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेळापूरचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सर्व सदस्य, सहशिक्षक, मैत्रिणी व आप्तेष्टांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button