मंगळसूत्र हिसकावण्यासाठी महिलेवर हल्ला.,..बोईसर पोलिसांची वेगवान कारवाई

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे रात्रीच्या वेळी महिलेवर धारदार हत्याराने हल्ला करून मंगळसूत्र लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अवघ्या पाच दिवसांत अटक केली आहे . सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक कौशल्यपूर्ण तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीला जेरबंद करण्यात आल्याने परिसरात पोलिसांच्या कारवाईचे कौतुक होत आहे.
दिनांक 11 मे 2026 रोजी पूजा दक्षीला मखयाना वय वर्ष 28 राहणार मंगलम अपार्टमेंट, अनुग्रह हॉटेलजवळ, बोईसर या आपल्या इमारतीखाली कुत्र्यांना चपाती देऊन परत घरात जात असताना एका अनोळखी इसमाने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेने धाडसाने विरोध करताच आरोपीने हातातील धारदार हत्याराने त्यांच्या चेहऱ्यावर वार केला. वार चुकविण्याच्या प्रयत्नात तो त्यांच्या नाकावर लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. महिलेच्या आरडाओरडीनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.
या घटनेनंतर बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता .या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी भगवान शांताराम चव्हाण वय वर्ष (40) राहणार सालवड, बोईसर, मूळ रा. आजोंदे, ता. मालेगाव, जि. नाशिक याला दि. 16 मे रोजी सालवड परिसरातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आले आहे.
आरोपीला पालघर न्यायालयात हजर केले असता त्याला दि. 20 मे 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत हाके करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल जाधव आणि बोईसर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.



