सोलापूर जिल्हा परिषद: स्वीकृत सदस्यासाठी मोहिते-पाटलांची खेळी; देशमुख, पाटील, भालके साथ देणार?

नौशाद मुलाणी संपादक Times 9 Marathi News Network
सोलापूर: सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर आता खरी रणनीती ‘स्वीकृत’ सदस्यांच्या निवडीसाठी आखली जात आहे. माळशिरसमध्ये भाजपला दणका दिल्यानंतर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ५ सदस्यांनी स्वतंत्र गटनोंदणी केली आहे. या गटाच्या गटनेतेपदी अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांची, तर उपगटनेतेपदी गौतम माने यांची निवड करण्यात आली आहे.
निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढलेले पक्ष आता तांत्रिक कारणास्तव स्वतंत्र गटनोंदणी करत आहेत. जिल्हा परिषदेत दर १० निवडून आलेल्या सदस्यांमागे १ स्वीकृत सदस्य नियुक्त केला जातो. सोलापूर जिल्हा परिषदेचे सध्याचे संख्याबळ पाहता:
भाजप: ४ जागा
शिवसेना: १ जागा
राष्ट्रवादी काँग्रेस: १ जागा
अशा एकूण ६ जागांचे समीकरण स्पष्ट दिसत असले, तरी सातव्या जागेसाठी मोहिते-पाटील गटाने फिल्डिंग लावली आहे.
आघाड्यांची जुळवाजुळव: ‘किंगमेकर’ ठरणार का?
जिल्हा परिषदेत सध्या चार मुख्य पक्ष आणि तीन स्थानिक आघाड्यांनी नोंदणी केली आहे. यात प्रामुख्याने:
करमाळा तालुका विकास आघाडी: आमदार नारायण पाटील यांचा गट.
सांगोला तालुका विकास आघाडी: आमदार बाबासाहेब देशमुख यांचा गट.
सोलापूर विकास आघाडी: आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार नारायण पाटील आणि भगीरथ भालके यांच्या ६ सदस्यांनी मिळून ही तिसरी आघाडी स्थापन केली आहे.
सातव्या जागेची ‘लॉटरी’ कुणाला?
जिल्हा परिषदेत स्वीकृत सदस्यांची सातवी जागा निवडून आणण्यासाठी किमान १० सदस्यांचे पाठबळ आवश्यक आहे. मोहिते-पाटील यांच्याकडे स्वतःचे ५ सदस्य आहेत. जर त्यांनी आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार नारायण पाटील आणि भगीरथ भालके यांच्या सोलापूर विकास आघाडीशी (६ सदस्य) हातमिळवणी केली, तर हे संख्याबळ ११ वर जाते.
महत्वाची बाब: जर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि या आघाड्यांनी एकत्र येऊन गणित जुळवले, तर सातव्या स्वीकृत जागेची लॉटरी महाविकास आघाडीला लागू शकते. अन्यथा, जिल्हा परिषदेत केवळ ६ स्वीकृत सदस्यांचीच निवड होईल.
जिल्हाधिकाऱ्यांकडे गटनोंदणी करण्यासाठी शनिवार (९ तारीख) पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ‘स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियमानुसार’ ही नोंदणी अनिवार्य असून, स्वीकृत सदस्यांच्या निवडीत गटनेत्याच्या शिफारशीला सर्वोच्च महत्त्व असते. त्यामुळेच अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांच्या निवडीकडे आगामी सत्तेच्या समीकरणाचा पहिला टप्पा म्हणून पाहिले जात आहे.
आता मोहिते-पाटलांच्या या ‘डावाला’ देशमुख, पाटील आणि भालके यांची साथ मिळून जिल्हा परिषदेत सातवा स्वीकृत सदस्य बसवण्यात विरोधकांना यश येते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.



