धैर्यशील मोहिते पाटलांचा शिंदे गटात प्रवेश? चर्चेवर खुद्द खासदारांनीच सोडले मौन; दिले ‘हे’ मोठे स्पष्टीकरण!

नौशाद मुलाणी संपादक Times 9 Marathi News Network
अकलूज : गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली होती – “खासदार धैर्यशील मोहिते पाटील शिंदे गटात जाणार का?” उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट आणि माळशिरस पंचायत समितीतील अनपेक्षित राजकीय समीकरणे यामुळे या चर्चांना उधाण आले होते. अखेर या सर्व वावड्यांवर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सविस्तर भाष्य करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या भेटीबाबत विचारले असता खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, “एकनाथ शिंदे हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. एक लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या मतदारसंघातील नगरपालिकांचे अनेक प्रलंबित प्रश्न नगरविकास विभागाशी संबंधित आहेत. जनतेची कामे मार्गी लावण्यासाठी मला संबंधित मंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटावेच लागेल. याचा अर्थ पक्षप्रवेश असा होत नाही.
पक्ष बदलण्याच्या चर्चा फेटाळून लावताना त्यांनी स्पष्ट केले की, “मी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्याच विचारधारेवर माढा लोकसभा मतदारसंघातून निवडून आलो आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत युती करून निवडणुका लढवल्या आहेत. फलटण, माण आणि खटाव तालुक्यातही आम्ही एकत्रितपणे निवडणुकांना सामोरे गेलो आहोत.”
माळशिरस पंचायत समितीत राष्ट्रवादी (शप) कडे स्पष्ट बहुमत असताना शिवसेनेचा सभापती का केला? यावर खासदारांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. “नूतन सभापती दत्ता मगर यांचे कुटुंब सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या काळापासून आमच्याशी एकनिष्ठ आहे. मगर कुटुंबाची तिसरी पिढी आजही मोहिते पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. दत्ता मगर तांत्रिकदृष्ट्या शिंदेसेनेच्या तिकिटावर निवडून आले असले, तरी ते मनापासून कट्टर मोहिते पाटील समर्थकच आहेत. निष्ठेचे फळ म्हणून त्यांना ही संधी देण्यात आली,” असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रीय राजकारणावरही भाष्य केले. पश्चिम बंगालमधील निवडणुकीचा संदर्भ देत त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केला. “बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी तब्बल ९० लाख मतदार गायब करण्यात आले होते. तिथे भाजपचे सरकार कसे आले, हे संपूर्ण देशाला माहीत आहे,” अशा शब्दांत त्यांनी भाजपच्या निवडणूक नीतीवर टीका केली.
राजकीय भेटीगाठींमधून अनेक अर्थ काढले जातात, मात्र विकासकामांसाठी सत्ताधाऱ्यांची भेट घेणे ही प्रशासकीय गरज असते. धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिलेल्या स्पष्टीकरणामुळे तूर्तास तरी त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. तरीही, राजकारणात ‘काहीही’ घडू शकते, हे विसरून चालणार नाही.



