अकलूज उप जिल्हा रुग्णालयात ‘ऑनलाइन’ विवाह प्रमाणपत्रे सुरू करा; भाजपाची निवेदनाद्वारे मागणी

नौशाद मुलाणी संपदाक Times 9 Marathi News Network
अकलूज: अकलूज येथील उप जिल्हा रुग्णालयात सध्या दिली जाणारी जुन्या पद्धतीची ‘ऑफलाइन‘ विवाह प्रमाणपत्रे बंद करून, त्याऐवजी आधुनिक आणि पारदर्शक अशी बारकोडयुक्त ऑनलाइन विवाह प्रमाणपत्रे वितरित करण्यात यावीत, अशी मागणी भारतीय जनता पार्टी, अकलूज शहराच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भातील मागणीचे निवेदन नुकतेच रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांना सादर करण्यात आले.
सध्याच्या डिजिटल युगात प्रशासकीय कामकाजात वेग आणि पारदर्शकता असणे अनिवार्य झाले आहे. भाजपा पदाधिकाऱ्यांनी निवेदनात नमूद केल्यानुसार, जुन्या पद्धतीची ऑफलाइन प्रमाणपत्रे अनेकदा पडताळणीच्या वेळी अडचणीची ठरतात. त्याऐवजी क्यूआर कोड (QR Code) किंवा बारकोड असलेली ऑनलाइन प्रमाणपत्रे दिल्यास नागरिकांची मोठी सोय होईल. यामुळे प्रमाणपत्राची सत्यता आणि वैधता कोठूनही सहज तपासणे शक्य होणार आहे.

हे निवेदन भाजपा अकलूज शहराध्यक्ष महादेव कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले. यावेळी शिष्टमंडळाने उप जिल्हा रुग्णालयातील प्रशासनाशी सविस्तर चर्चा करून तांत्रिक बदलांची गरज अधोरेखित केली.
याप्रसंगी उपस्थित असलेले मान्यवर:अमोल माने (सरचिटणीस, भाजपा अकलूज शहर),अमर शेख (अध्यक्ष, युवा मोर्चा मंडल, अकलूज),संतोष वाघमोडे (चिटणीस, युवा मोर्चा),शाबाज काझी (सक्रिय कार्यकर्ते),आयाज तांबोळी (सक्रिय कार्यकर्ते)

अकलूजसह माळशिरस तालुक्यातील हजारो नागरिक विवाह नोंदणी आणि प्रमाणपत्रासाठी या उप जिल्हा रुग्णालयावर अवलंबून असतात. सध्याच्या ऑफलाइन प्रक्रियेत वेळ आणि श्रमाचा अपव्यय होतो. ऑनलाइन प्रणाली कार्यान्वित झाल्यास कामात सुसूत्रता येईल आणि सामान्य नागरिकांचा वेळ वाचेल. प्रशासनाने या जनहितार्थ मागणीवर त्वरित आणि सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी भाजपा कार्यकर्त्यांनी केली आहे.



