अकलूज पोलिसांची मोठी कारवाई; चोरीला गेलेले ५० मोबाईल हस्तगत, मूळ मालकांना केले परत

नौशाद मुलाणी संपादक Times 9 Marathi News Network
अकलूज : अकलूज आणि परिसरातील नागरिकांचे चोरीला गेलेले किंवा हरवलेले मोबाईल शोधण्यात अकलूज पोलीस ठाण्याला मोठे यश आले आहे. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी जानेवारी २०२६ पासून आतापर्यंत एकूण ५० महागडे मोबाईल हस्तगत केले असून, आज एका विशेष कार्यक्रमात हे मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना सन्मानपूर्वक परत करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, मोबाईल चोरीला गेल्याच्या तक्रारी आल्यानंतर पोलिसांनी भारत सरकारच्या CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलचा प्रभावी वापर केला. या पोर्टलवर संबंधित मोबाईलचे आय.एम.ई.आय (IMEI) नंबर ब्लॉक करून तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. त्याद्वारे प्राप्त माहितीवरून पोलिसांनी महाराष्ट्र तसेच परराज्यातून कौशल्याने तपास चक्रे फिरवली आणि एकूण ५० मोबाईल संच शोधून काढले.

आज दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी अकलूज पोलीस ठाण्यात हे मोबाईल मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले. आपला हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल पुन्हा मिळाल्यामुळे नागरिकांनी आनंद व्यक्त करत पोलीस प्रशासनाचे मनापासून आभार मानले. विशेष म्हणजे, यापूर्वीही अकलूज पोलिसांनी ७५ मोबाईल हस्तगत करून नागरिकांना परत केले होते.
ही धडाकेबाज कामगिरी सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी (अकलूज विभाग) संतोष वाळके आणि पोलीस निरीक्षक निरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या तपास मोहिमेत पोलीस अंमलदार तुळशिराम गायकवाड यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधिर टेंगले, महिला पोलीस उपनिरीक्षक करिश्मा वणवे, पोलीस अंमलदार बबलू गाडे, तानाजी टिंगरे, राहुल रणनवरे आणि फिर्यादी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ठळक मुद्दे:
हस्तगत मोबाईल: ५० नग (जानेवारी २०२६ पासून)
एकूण कारवाई: यापूर्वी ७५ मोबाईल परत केले होते.
तपासाचे साधन: तांत्रिक विश्लेषण आणि CEIR पोर्टल.
अवाहन: मोबाईल हरवल्यास तात्काळ तक्रार नोंदवून पोर्टलचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.



