अकलूजमध्ये हनुमान जयंतीनिमित्त सेवाभावाचा आदर्श — अन्नदान, रक्तदान व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न.वडार समाज व S.B. ग्रुपचा स्तुत्य उपक्रम.

प्रतिनिधी सोमनाथ पवार Times 9 Marathi News Network
अकलूज : येथील S.B. ग्रुप अकलूज शहर व सकल वडार समाज महाराष्ट्र राज्य (शाखा अकलूज) यांच्या संयुक्त विद्यमाने श्री हनुमान जयंतीचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जोपासणारा भव्य उपक्रम राबवण्यात आला. अन्नदान (महाप्रसाद), रक्तदान शिबिर आणि नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सत्कार समारंभ अशा त्रिवेणी संगमाने हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या रक्तदान शिबिरात युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. एकूण १८० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक कर्तव्याची जाणीव करून दिली. यावेळी उपस्थित हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

अकलूज नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. रेश्मा लालासाहेब अडगळे, उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांचा यावेळी वडार समाजातील ज्येष्ठ नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. नगराध्यक्षा रेश्मा अडगळे यांनी यावेळी बोलताना, “भविष्यात शैक्षणिक शिबिरे राबवून समाजाला अधिक सक्षम करा,” असा मोलाचा सल्ला दिला.
तसेच उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी या नियोजनाचे कौतुक करताना ही सामाजिक उपक्रमांची परंपरा अशीच कायम राखण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाला कुमारी इशितादेवी धैर्यशील मोहिते-पाटील यांनी आवर्जून उपस्थिती लावली. त्यांनी केवळ पाहुणे म्हणून न थांबता स्वतः नागरिकांना प्रसाद वाटप केले, रक्तदात्यांशी संवाद साधला आणि रात्रंदिवस मेहनत घेणाऱ्या आचारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करून एक वेगळा आदर्श निर्माण केला.
नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत वडार समाजातून विजयी झालेल्या सौ. शितल परशुराम बनपट्टे व कुमारी उज्वला शिवाजी विटकर यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला नगरसेवक क्रांतीसिंह माने-पाटील, सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्यासह सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि मोठा मित्रपरिवार उपस्थित होता.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी S.B. ग्रुप आणि वडार समाजाच्या कार्यकर्त्यांनी कष्ट उपसले. उपस्थितांचे आभार मानताना आयोजकांनी, “सेवा, समर्पण आणि समाजहित या तत्त्वावर भविष्यातही शैक्षणिक व सामाजिक कार्य अधिक गतीने करू,” असा निर्धार व्यक्त केला.



